नेमकी घटना काय?
मयत महिलेचे नाव नम्रता शैलेंद्र व्हटकर (१९) असून, या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर (३०) याला अटक केली आहे. आरोपी शैलेंद्र हा मूळचा बकोरी येथील रहिवासी आहे. नम्रता ही पतीकडे वारंवार सोन्याच्या दागिन्यांसाठी हट्ट करत होती. याच कारणावरून त्यांच्यात सतत खटके उडत होते. या वादाचा राग मनात धरून शैलेंद्रने नम्रताला वाडेबोल्हाई येथील एका निर्जन ठिकाणी बोलावून घेतले.
advertisement
चाकूने वार करून हत्या: दोघांमध्ये पुन्हा एकदा दागिन्यांवरून वाद झाला. रागाच्या भरात शैलेंद्रने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात नम्रताचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी शाहरुख दस्तगीर पठाण यांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अवघ्या १९ व्या वर्षी नम्रताचा असा दुर्दैवी अंत झाल्याने शिरसवडी आणि वाघोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
