पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडू शकतात.
फ्रिजमध्ये बर्फाचा जाड थर तयार होतोय? टेन्शन सोडा, फाॅलो करा 'या' टिप्स; फ्रिज राहील टकाटक
advertisement
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.या भागांमध्ये प्रचंड विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी आकाश संपूर्णपणे ढगाळ राहून दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुण्यातील किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतक असू शकतं. सकाळपासून आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग काहीसा वाढलेला देखील जाणवू शकतो.
छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी दुपारी किंवा रात्री विजांचा कडकडाट होऊन पावसाची शक्यता आहे. नाशिकमधील किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये उष्णतेचा जोर काहीसा कायम असून तेथील किमान तापमान 29 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांचा कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे.
राज्यात अनेक भागांत अचानक पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. विशेषतः फळझाडे, भाजीपाला या पिकांवर परिणाम होत आहे. हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडे आणि विजेच्या तारांपासून दूर राहावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





