दीपक खडके असं भोंदूबाबाचं नाव आहे. त्याने वेदिका पंढरपूरकर या महिलेला हाताशी धरून ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. तर दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते एका मोठ्या आयटी कंपनीत इंजिनिअर आहेत. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. त्यांनी काही वर्षे आधी इंग्लंडमध्ये नोकरी केली होती. तिथे त्यांनी स्वत:चं घर आणि फार्म हाऊस देखील खरेदी केलं होतं. आता त्यांना आयुष्यभराची कमाई गमवावी लागली आहे. कोट्याधीश असलेलं हे दाम्पत्य भोंदूगिरीच्या नादी लागून आता रस्त्यावर आलं आहे.
advertisement
नेमकी फसवणूक कशी झाली?
दीपक डोळस यांना दोन मुली आहेत. त्या आजारी असतात. त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी २०१८ साली ते आरोपी दीपक खडकेच्या दरबारात गेले होते. यावेळी तिथे वेदिका पंढरपुरकर हीने तिच्या अंगात शंकर महाराज येतात अशी अॅक्टींग केली. विश्वास संपादन करून तुमची संपत्ती आमच्याकडे दिल्यास तुमच्या अंगात शंकर महाराज येतील, असे सांगून दोघांनी बँकेतील सर्व पैसे आणि ठेवी वेदिका यांच्या खात्यात वळत्या करायला लावल्या.
मात्र तरीही डोळस यांच्या मुली बऱ्या झाल्या नाही. त्यामुळे त्यांनी खडके आणि पंढरपुरकर यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी तुमच्या घरात दोष आहेत, असं सांगितलं. डोळस हे काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे त्यांचं इंग्लंडमध्ये देखील घर होतं आणि फार्महाऊस खरेदी केले होते. ते इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस त्यांना विकायला लावण्यात आलं आणि ते पैसे पंढरपुरकर यांच्या खात्यात वळते करण्यात आले. त्यानंतर डोळस यांना त्यांचा पुण्यातील प्लॉट आणि फ्लॅट विकण्यास सांगण्यात आलं आणि ते पैसे देखील हडप करण्यात आले.
आपल्या दोन लहान मुली बऱ्या होतील या अपेक्षेने डोळस सर्व करत गेले. मात्र मुली बऱ्या होत नाहीत असं लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांच्याकडे विचारणा केली. यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरात दोष असल्याचं सांगितलं. मात्र आता राहण्यासाठी एकमेव घर उरले असल्याचं डोळस यांनी सांगितले आणि घर विकण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर डोळस यांना ते घर तारण ठेऊन घरावर लोन काढण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर पर्सनल लोन देखील काढण्यास सांगण्यात आलं. हा सगळा पैसा दीपक खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांनी हडप केला आणि त्या पैशातून कोथरुड येथील महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला आहे.
