इ.स. 8 व्या शतकात राष्ट्रकूट वंश काळात घडवण्यात आलेल्या या लेणी दगडी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. एका अखंड दगडात कोरलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून त्याची रचना आणि स्थापत्य वैशिष्ट्ये पर्यटकांना आकर्षित करतात. विशेषतः लेणीतील गोलाकार नंदी मंडप हे मुख्य आकर्षण मानले जाते.
इतिहासात या लेणीचा उल्लेख विविध नावांनी करण्यात आला आहे. पेशव्यांच्या दफ्तरात सुमारे 1810 सालच्या कागदपत्रांमध्ये या स्थळाचा भुयारातील महादेव असा उल्लेख आढळतो. पूर्वी या परिसरात दाट झाडी असल्यामुळे ही लेणी भुयारासारखी वाटत होती, त्यामुळे हे नाव प्रचलित झाले. तसेच जमिनीखाली उतरत असल्याचे वाटत असल्याने पाताळेश्वर हे नावही रूढ झाले.
advertisement
आजचे छत्रपती शिवाजीनगर हे पूर्वी भांबुर्डा या नावाने ओळखले जात होते. याच परिसरात ही लेणी वसलेली आहेत. लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम गोलाकार नंदी मंडप दिसतो. त्यानंतर तीन स्तरांमध्ये विभागलेला सभामंडप आणि पुढे तीन स्वतंत्र गर्भगृह पाहायला मिळतात. अभ्यासकांच्या मते, या तीन गर्भगृहांमध्ये पूर्वी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती स्थापण्यात आल्या असाव्यात किंवा त्यासाठी बांधल्या गेले असावेत.
विशेष म्हणजे ही लेणी पूर्णतः बांधकाम पूर्ण झालेली नसून काही प्रमाणात अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसते. लेणीच्या डाव्या बाजूस हत्तीच्या मुखाचे शिल्प तर उजव्या बाजूस लिंगोद्भव स्वरूपातील शिवाचे शिल्प कोरलेले आहे. या शिल्पांमधून त्या काळातील कलाकारांची कौशल्यपूर्ण दगडी कोरीवकामाची परंपरा स्पष्टपणे दिसून येते.
लेणीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे कोरलेले प्राचीन खेळ. जमिनीवर मंकळा आणि सारिपाठ या पारंपरिक खेळांच्या रेषा कोरलेल्या दिसतात. या गोष्टी त्या काळातील सामाजिक जीवन, आणि संस्कृतीचे दर्शन घडवतात. अशा प्रकारचे वैशिष्ट्य जगातील इतर लेण्यांमध्ये क्वचितच आढळते.
भारतामध्ये सुमारे 1800 हून अधिक लेण्या आढळतात. या लेण्या प्रामुख्याने बौद्ध, जैन आणि हिंदू अशा तीन प्रकारांमध्ये विभागल्या जातात. पाताळेश्वर लेणी ही हिंदू परंपरेतील असून तिचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व मोठे आहे. सध्या या लेणीची देखभाल Archaeological Survey of India या संस्थेकडून केली जाते.
इतिहासात या लेणीचे महत्त्व अधोरेखित करणारी एक नोंद 1803 सालची आहे. ब्रिटिश चित्रकार थॉमस डॅनिल यांनी या लेणीचे वॉटरकलर चित्र रेखाटले होते. त्या चित्रामध्ये लेणीसमोर पाणी भरलेला हंडा घेऊन उभी असलेली स्त्री दाखवण्यात आली आहे. त्या काळी लेणीभोवती जाळी किंवा संरक्षण नसल्याचेही या चित्रातून स्पष्ट होते. अशी माहिती इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यांनी दिली आहे.
आजच्या घडीला पाताळेश्वर लेणी पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाकडून या ठिकाणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. ऐतिहासिक वारसा जपत पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराच्या मध्यभागी असूनही निसर्ग, शांतता आणि इतिहास यांचा संगम अनुभवण्यासाठी पाताळेश्वर लेणी हे एक अद्वितीय ठिकाण ठरत आहे. इतिहासप्रेमी, पर्यटक आणि भक्तांसाठी हे ठिकाण कायमच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.





