Baramati Election: सुनेत्रा पवारांचा एक फोन कॉल, दत्तामामांची फिल्डींग, बारामतीच्या रिंगणातून कोणी घेतली माघार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Baramati bypoll: बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न महायुतीकडून सुरू आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेससह आणखी काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक अत्यंत महत्त्वाची आणि अनपेक्षित राजकीय घडामोड घडली आहे. बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न महायुतीकडून सुरू आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेससह आणखी काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधीच बारामती पोटनिवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर हाके यांनी थेट सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बारामतीमधील लढत आता प्रामुख्याने सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेसचे आकाश मोरे अशी रंगणार आहे.
दत्तात्रय भरणेंची 'फिल्डिंग' यशस्वी
advertisement
लक्ष्मण हाके हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पूर्ण तयारीत बारामतीत दाखल झाले होते. मात्र, त्यांच्या एन्ट्रीने महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने हाके यांची भेट घेत 'फिल्डिंग' लावली. अजितदादांच्या निधनानंतरची भावनिक परिस्थिती आणि मतदारसंघाच्या विकासाची गरज लक्षात घेऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा किमान महायुतीला पाठिंबा मिळावा, यासाठी भरणे यांनी हाके यांची मनधरणी केली.
advertisement
सुनेत्रा पवारांचा फोन अन् हाकेंकडून माघार
मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून हाके यांच्यासोबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यानंतर हाके यांनी आपला विचार बदलला. "सुनेत्रा ताई, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उदय सामंत, धनंजय मुंडे आणि दत्ता भरणे या सर्वच बड्या नेत्यांनी माझ्याशी संवाद साधला. इतके वरिष्ठ नेते जर आपल्याला फोन करत असतील, तर आपण नक्कीच विचार करायला हवा," असे म्हणत हाके यांनी माघार घेतली.
advertisement
लक्ष्मण हाके यांच्या माघारीमुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला असून ओबीसी मतांचे विभाजन टळले आहे. आता बारामतीची ही लढाई थेट महायुती (सुनेत्रा पवार) विरुद्ध महाविकास आघाडी (आकाश मोरे) अशी होणार आहेत. जवळपास १९ अपक्ष उमेदवारांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 11:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati Election: सुनेत्रा पवारांचा एक फोन कॉल, दत्तामामांची फिल्डींग, बारामतीच्या रिंगणातून कोणी घेतली माघार?







