'ती गॅलरीतून पडली'; मृत पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहोचला पुण्यातील पती, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पत्नी गॅलरीतून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला, असा खोटा बनाव रचणाऱ्या नराधम पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : पुण्यातून पुन्हा एकदा हत्येचं एक खळबळजनक प्रकरण समोर आलं. बिबवेवाडी परिसरात २४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या एका हत्याकांडाचा पोलिसांनी छडा लावला आहे. पत्नी गॅलरीतून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला, असा खोटा बनाव रचणाऱ्या नराधम पतीला पोलिसांनी अटक केली आहे. सारिका शुभम घोडके (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती शुभम श्रीकांत घोडके (वय २९) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम घोडके हा पत्नी सारिकाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. २४ मार्च रोजी झालेल्या अशाच एका वादाचे रूपांतर हिंसेत झाले. रागाच्या भरात शुभमने सारिकाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्यावर वार करून तिची हत्या केली.
अपघाताचा बनाव
हत्या केल्यानंतर घाबरलेल्या शुभमने या घटनेला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला. सारिका गॅलरीतून खाली पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, असा कांगावा त्याने केला. सारिकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
advertisement
पोलिसांची चाणाक्ष नजर
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सारिकाच्या अंगावरील जखमांचे स्वरूप आणि गॅलरीतून पडण्याच्या दाव्यात पोलिसांना तफावत दिसून आली. घटनास्थळावरील संशयास्पद परिस्थितीमुळे पोलिसांनी शुभमला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. पोलिसांच्या खाकीचा इंगा दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.
बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 11:35 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'ती गॅलरीतून पडली'; मृत पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहोचला पुण्यातील पती, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा










