महाराष्ट्रातील काही उत्सव तर सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जातात. यापैकीच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा नगराने भावई उत्सवाची दीर्घ परंपरा जपली आहे. हाच भावई उत्सव एका गावातून दुसऱ्या गावात कसा पोहचला याविषयी नेर्ले गावचे ग्रामस्थ बबन पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलताना एक आख्यायिका सांगितली.
advertisement
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी नेर्ले गावातील मातंग समाजातील झिंजारबा मांग यांनी आष्ट्यात भावई उत्सव पहायला गेल्यावर तेथील सोन्याची वाटी चोरून आणली. त्यांचा आष्ट्यातील काही लोकांनी पाठलाग केला. कापूसखेडच्या हद्दीपर्यंत आल्यानंतर झिंजारबा हे पाठलाग करणाऱ्यांच्या तावडीत सापडले. यावेळी त्यांना ठार मारण्यात आले. त्या अगोदर त्यांनी हातातील वाटी नेर्ले गावच्या वेशीवर टाकली. ती वाटी भाऊसाहेब पाटील यांच्या शेतात पडली. त्यावेळच्या श्रद्धेनुसार ती सोन्याची वाटी ज्यांच्या गावात त्यांनी उत्सव साजरा करून परंपरा संभाळावी. तेव्हापासून गावचे भाऊसाहेब पाटील आणि मोहन नांगरे-पाटील यांनी बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन जोगण्या उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
Ashadhi Wari 2025: महाराष्ट्रातील एकमेव टाळ मंदिर, जिथं केली दगडी टाळाची पूजा, इतिहास माहितीये का?
इंग्रज काळात म्हणे मिळत होती देणगी
भावई उत्सव साजरा करण्याची जबाबदारी गावातील लोकांनी प्रतिष्ठित आणि धनसंपन्न कुटुंब म्हणून नांगरे-पाटील यांच्याकडे दिली होती. इंग्रज पूर्वकाळात हा उत्सव साजरा करण्यासाठी इंग्रज सरकारकडून देणगी स्वरूपात काही रुपये मदत मिळत असल्याची आख्यायिका देखील ग्रामस्थ सांगतात.
सामाजिक एकतेचा संदेश
या उत्सवात गावामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचा समावेश असतो. पूर्वी बारा बलुतेदारांकडून वर्षभर गावातील कामे होत होती. संपूर्ण गावासाठी राबणाऱ्या बारा बलुतेदारांच्या आनंद उत्सव म्हणून भावई किंवा जोगण्या हा कार्यक्रम घेतला जात होता. या उत्सवानिमित्त सर्व भांडण तंटा विसरून बारा बलुतेदार एकत्र येत होते.
परंपरा आजही कायम
भावई म्हणजेच जोगण्या उत्सवाबद्दल लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. दोनशे वर्षांहून अधिक काळातील ही परंपरा श्रद्धेपोटी आजही कायम असल्याचे दिसते. उत्सवाच्या निमित्ताने नोकरी, व्यवसायासाठी शहरात राहणारे लोक गावी परतात. एकत्र येत परंपरा जपत आहेत.
ज्येष्ठ वद्य दशमीपासून सुरू होणारा उत्सव नेर्ले, कासेगाव, शिरगाव गावांमध्ये चार दिवस चालतो. तसेच उत्सवाचे मुख्य ठिकाण असलेल्या आष्टा नगरीमध्ये महिनाभर उत्सव असतो. मोठ्या श्रद्धेने बारा बलुतेदार एकत्र येत एकतेचा संदेश देत भावई उत्सवाची परंपरा जपत आहेत.
भावई किंवा जोगण्या नावाने ओळखला जाणारा हा उत्सव मूळचा कर्नाटकातील बदामी इथला असल्याचे सांगितले जाते.