वाराणसी, 28 डिसेंबर : येत्या 22 डिसेंबरला अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात रामललाचे आगमन होणार आहे. या प्रतिष्ठापना सोहळ्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे यजमान राहणार आहेत.
देशभरातील अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना याठिकाणी या विशेष कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, यासोबतच बाबा विश्वनाथचे शहर काशी म्हणजे वाराणसीमधील भिक्षेकरीसुद्धा अयोध्येच्या राम मंदिर प्रतिष्ठापना पूजेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
advertisement
या भिक्षेकऱ्यांनी राम मंदिराच्या उभारणीच्या समर्पण निधी मोहिमेत हातभार लावला होता. त्यासाठी संघाच्या वतीने भिक्षेकऱ्यांची ओळख करून त्यांना या ऐतिहासिक क्षणात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.
श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून प्रतिष्ठापना पूजेच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, काशी आणि प्रयागराजमधील अनेक भिकाऱ्यांनी समपर्ण निधी मोहिमेत साडेचार लाख रुपये दान केले आहेत. आता या भिकाऱ्यांना या प्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी केले जाईल.
राममंदिराच्या निर्माण कार्यासाठी संपूर्ण जगभरातून लोकांनी राम भक्तांनी आपला सहभाग नोंदवला होता. या रामभक्तांमध्ये अनेक मुस्लिमांचाही समावेश होता.आता जवळपास रामललाचा 500 वर्षांचा वनवास संपुष्टात येत असताना, या मंदिरामुळे देशाला सामाजिक एकता आणि समरसतेचा संदेश दिला जाईल, यासाठी या ऐतिहासिक क्षणासाठी या योगदानात सहभागी असलेल्या सर्वांचा समावेश करण्यात येत आहे.
Exclusive : राम मंदिराचे आजपर्यंत कधी न पाहिलेले फोटो, बांधकाम कुठपर्यंत आलं लगेच समजेल, PHOTOS
300 भिकाऱ्यांनी दिला होता निधी -
मिळालेल्या माहितीनुसार, समर्पण निधीमध्ये तीर्थराज काशी आणि प्रयागराज येथील 300 हून अधिक भिक्षेकऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून श्री राम मंदिर तीर्थ ट्रस्टला साडेचार लाख रुपये दान केले. यानंतर आता या भिक्षेकऱ्यांना अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे.
