सनातन धर्मात भगवान शंकर हे विश्वाचे संहारक म्हणून ओळखले जातात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यातेल ते महेश म्हणजे एक प्रमुख देवता आहेत. भगवान शंकर शिवशंकर, भोलेनाथ या नावांनीदेखील परिचित आहेत. हिंदू धर्मानुसार, भगवान शंकराला महादेव ही उपाधी दिली गेली आहे. इतर कोणत्याही देवतेला ही उपाधी मिळालेली नाही. कारण विश्वाच्या निर्मितीपूर्वी भगवान शंकर अस्तित्वात होते आणि विश्वाच्या समाप्तीनंतरही ते कायम राहतील, असं मानलं जातं. महादेव म्हणजे महान दैवी शक्ती असलेले किवा देवांचे देव होय. त्यामुळे भगवान शंकरच महादेव असू शकतात.
advertisement
भगवान शंकराने रौद्र रूप धारण केलं तर तिन्ही लोक भयभीत होतात. भोलेनाथ हे त्यांचं दुसरं रूप आहे. कोमल हृदय आणि दयाळूपणा असा भोलेनाथ शब्दाचा अर्थ आहे. भगवान शंकर केवळ शुद्ध मनाने शिवलिंगावर अभिषेक करणाऱ्या भक्तावर प्रसन्न होतात. त्यामुळे त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं.
पौराणिक कथांनुसार, जेव्हा देव आणि दानव म्हणजे राक्षसांमध्ये अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन झालं तेव्हा त्यातून विष निर्माण झालं. हे विष इतकं भयंकर होतं की त्यामुळे दहा दिशांना आग लागली. तेव्हा विश्वरक्षणासाठी भगवान शंकरानं विषपान केलं. त्या विषामुळे शंकराचा गळा निळा पडला. त्यामुळे भगवान शंकर हे नीळकंठ या नावाने ओळखले जातात.
भगवान शंकराला महामृत्युंजय असंही म्हटलं जातं. मृत्यूवर विजय मिळणारा आणि ज्याच्यावर मृत्यूचा कोणताही परिणाम होत नाही असा महामृत्युंजय शब्दाचा संस्कृत अर्थ होतो. भगवान शंकराच्या स्तुतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो. या मंत्राच्या जपानं अकाली मृत्यूचं संकट दूर होतं असं मानलं जातं. अर्धनारीश्वर अर्थात अर्धनारीनटेश्वर हेदेखील भगवान शंकराचं रुप आहे. यात महादेवाचं अर्ध शरीर स्त्रीचं तर अर्ध पुरुषाचं आहे. भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर रूपाच्या अर्ध्या भागात भगवान शिव पुरुष रूपात, तर उर्वरित अर्ध्या भागात शक्ती स्त्री रूपात वास करतात. या रूपातून भगवान शंकर भक्तांना स्त्री आणि पुरुष एकमेकांसाठी पूरक असून ते एकमेकांविना अपूर्ण आहे, असा संदेश देतात.