माघ अमावस्या 2026 तारीख आणि वेळ
हिंदू पंचांगानुसार तारीख आणि वेळ पाहायला गेलो तर, माघ महिन्याची अमावस्या तिथी सोमवार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 05:47 वाजता सुरू होईल आणि मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 04:27 वाजता समाप्त होईल. शास्त्रांनुसार, ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते, ती दिवसभर मानली जाते. त्यामुळे मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी 'माघ अमावस्या' साजरी केली जाईल. या दिवशी स्नान, दान आणि तर्पण विधी करणे अत्यंत फलदायी ठरेल.
advertisement
माघ अमावस्येचे महत्त्व आणि विधी
पवित्र स्नान: माघ अमावस्येला 'मौनी अमावस्या' असेही म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी कोणत्याही पवित्र नदीत किंवा घरात गंगेचे पाणी मिसळून स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे.
पितृ तर्पण: अमावस्या ही पितरांची तिथी मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद लाभतो.
मौन व्रत: या दिवशी 'मौन' पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. मौन पाळून आत्मचिंतन केल्याने मानसिक शक्ती वाढते आणि मनाला शांती लाभते. जर पूर्ण वेळ शक्य नसेल, तर किमान जप करताना तरी मौन पाळावे.
अन्न आणि वस्त्र दान: अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, तीळ, गूळ, कापड किंवा ब्लँकेट दान करणे महापुण्य मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण दूर होते.
शनी आणि राहू दोष निवारण: मंगळवारी अमावस्या आल्याने याला 'भौमवती अमावस्या' देखील म्हटले जाईल. ज्यांच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष आहेत, त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा.
पिंपळाच्या झाडाचे पूजन: या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातल्याने सौभाग्य वृद्धी होते. पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णूंचा वास असतो, अशी श्रद्धा असल्याने विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
