मुंबई: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्याला सर्वच भाविकांना किंबहुना मुंबईकरांना दूरच्या प्रवासामुळे जाता येत नाही. आता मुंबईकर भाविकांना मुंबईतच महाकुंभमेळ्याचा अनुभव घेता येणार आहे. कांदिवलीच्या समता नगर येथील इच्छापूर्ती माघी गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी प्रयागराज येथील काशी विश्वनाथ मंदिराची आणि गंगा घाटाची प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होतेय.
advertisement
कांदिवलीचा इच्छापूर्ती माघी गणेशोत्सव मंडळातील काही सदस्यांनी प्रयागराज येथे जाऊन तेथील गंगा नदीचे पवित्र जल आणले आहे. हे जल प्रसाद म्हणून भाविकांना मोफत वाटप करत आहेत. गणेशोत्सव साजराकरण्या पलीकडे कांदिवलीचा इच्छापूर्ती माघी गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्याला हातभार लावत आहे. या ठिकाणी संध्याकाळची आरती आश्रमातील मुलांच्या हाताने घेण्यात येते. तसेच पर्यावरण पूरक उपक्रम साकारतात. मंडळात येणाऱ्या भाविकांना रोपटं भेट देत आहे. या रोपट्याचे संगोपन करून वर्षभरानंतर ते गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी झाडे लावणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली.
कसा साकारला महाकुंभ मेळा?
प्रयागराज महाकुंभमेळा आणि काशी विश्वनाथ येथील प्रतिकृती साकारण्यासाठी कलादिग्दर्शक अमन विधाते यांना जवळपास 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागला आहे. कांदिवलीचा इच्छापूर्ती माघी गणेशोत्सव मंडळात संध्याकाळच्या वेळी होणाऱ्या गंगाआरती निमित्त नागरिकांची भली मोठी गर्दी होते. तसेच प्रयागराज येथून आणलेल्या पवित्र जलाचे देखील दर्शन घेण्यासाठी नागरिक या ठिकाणी भेट देत आहेत. तुम्हाला देखील महाकुंभ मेळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर कांदिवलीच्या इच्छापूर्ती माघी गणेशोत्सव मंडळाला नक्की भेट द्या.