एकदा इंद्रांच्या सभेत उर्वशी नृत्य सादर करत होती. तिचं आकर्षक रूप आणि नाजूक नृत्य पाहून राजा पुरुरवा आकर्षित झाले. त्यांच्यामुळे उर्वशीच्या नृत्यात अडथळा निर्माण झाला. मग इंद्र संतापले, त्यांनी दोघांनाही मृत्यूलोकात राहण्याचा शाप दिला. मग काही अटींनुसार पुरुरवा आणि उर्वशी मृत्यूलोकात पती-पत्नीसारखे राहू लागले. दोघांना अनेक पुत्र झाले. त्यातील एक होता नहुष. नहुषला ययाति, संयाति, अयाति, अयति आणि ध्रुव हे पुत्र झाले. मग ययातिला यदु, तुर्वसु, द्रुहु, अनु, पुरु हे पुत्र झाले. यदुला यादव आणि पुरुला पौरव झाले. तसंच पुरूच्या वंशात पुढे कुरू झाले आणि कुरूपासून कौरव झाले. भीष्म पीतामह कुरुवंशी होते. त्यामुळे पांडवही कुरुवंशी होते. म्हणजेच अर्जुनसुद्धा कुरुवंशी होता.
advertisement
जेव्हा उर्वशीनं अर्जुनाला पाहिलं...
अप्सरा उर्वशीच्या सौंदर्याची दूरदूरवर चर्चा होती. भलेभले तिला पाहून भान हरपत असत. त्यामुळे तिला आपल्या सौंदर्यावर प्रचंड गर्व होता. आपण आपल्या मोहकतेनं कोणालाही आकर्षित करू शकतो असं तिला वाटत असे.
जेव्हा उर्वशी इंद्र सभेत अर्जुनाला बघून आकर्षित झाली होती, तेव्हा तिनं अर्जुनाशी प्रेम करण्याची, प्रणय संबंध निर्माण करण्याची इच्छा व्यक्ती केली. तशी तिनं त्याला विनवणीही केली. परंतु अर्जुनानं म्हटलं, 'हे देवी, आमच्या पूर्वजांनी आपल्याशी विवाह करून आमचा वंश वाढवला. पुरु वंशाची जननी होण्याच्या नात्यानं आपण माझ्या आईसमान आहात.' अर्जुनाचे हे बोल ऐकून उर्वशी प्रचंड संतापली. ती अर्जुनाला म्हणाली की, 'तुझे हे बोल नपुंसकासारखे आहेत. मी तुला शाप देते की, तू वर्षभर नपुंसक राहशील.' हा शाप अर्जुनासाठी मात्र वरदानासारखा ठरला.
अज्ञातवासात असताना अर्जुनानं विराट नरेश यांच्या महलात किन्नर वृहन्नलला होऊन संपूर्ण वर्ष अज्ञातवासात काढलं. त्यावेळी त्याला कोणी ओळखूच शकलं नाही. त्यानं तिथली राजकुमारी उत्तरा हिला नृत्य आणि गायनाचं प्रशिक्षणही दिलं होतं. अर्जुनासोबत द्रौपदी आणि इतर पांडवही वेश बदलून राहत होते.