यवतमाळ: महाशिवरात्रीला भारतभरातील शिवमंदिरात मोठा उत्सव असतो. यवतमाळ येथील ऐतिहासिक केदारेश्वर मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये चार धाम दर्शनाला महत्व आहे. यातील केदारनाथ हे एक असून याच मंदिराची प्रतिकृती यवतमाळमध्ये तयार करण्यात आली आहे. जवळपास दीड हजार वर्षांपूर्वी हेमाद्रीपंतांनी हे ऐतिहासिक मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. आजही मंदिर सुस्थितीत असून महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते.
advertisement
प्राचिन शिल्पकेलचा वारसा सांगणारी दोन मंदिरे यवतमाळ शहरात आहेत. यामध्ये आझाद मैदानालगतचे केदारेश्वर मंदिर आणि लोहारातील कमलेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला यवतमाळच्या भाविकांना केदारनाथ दर्शनाचे सुख आपल्या गावातच मिळतंय, असे भाविक सांगतात.
स्थापत्यकलेचा उत्तम नमुना
काळ्या पाषाणापासून बांधलेले केदारेश्वर मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. शेकडो वर्षांचे हे मंदिर आजही दिमाखदारपणे उभे आहे. मंदिराची उभारणी करताना खास तंत्राचा वापर करण्यात आला आहे. आतील भागात खांबांवर नक्षीकाम आहे. परिसरात विस्तीर्ण जलकुंड आहे. त्यामध्ये भुयारही आहे. या जलकुंडाला मुबलक पाणी आहे. मंदिराच्या परिसरात शितला माता, नाग मंदिर, काल भैरव, मारूती, शनिमंदिर, अंबिका माता आणि काशिनाथ महाराजांचे मंदिर आहे.
2 फुटाची हनुमान मूर्ती 50 वर्षांत झाली 6 फूट, महाराष्ट्रातील या मंदिरात खरं काय घडतंय?
पौर्णिमेला होते अन्नदान
अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष अन्नदान करण्यात येते. दररोज 150 व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. श्रावण, शिवरात्री, काशिकर महाराज पुण्यतिथी, गरुपौर्णिमा, हरिहर भेट, संक्रांत दीपमाला हे उपक्रम राबविण्यात येतात. पुजारी राजीव गिरी यांची सातवी पिढी सध्या या ठिकाणी सेवा देत आहे. सध्या बऱ्याच वर्षांनी मंदिरात विकास कामे केली जात आहेत. या मंदिरात दर्शनासाठी यवतमाळच्या बाहेरील जिल्ह्यातून देखील नागरिक आवर्जून येतात.