नाशिक: पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणूनच नाशिकला ओळखले जाते. नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर असून श्री काळाराम मंदिर हे यापैकीच एक आहे. याच काळाराम मंदिराचा संबंध थेट श्रीराम आणि रामायण यांच्याशी जोडला जातो. राम वनवासात असतानाच त्यांचे बहुतांश काळ याच पंचवटी परिसरात वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. याबाबत काळाराम मंदिराचे पुजारी चंद्रशेखर गुरुजी यांनी माहिती दिलीये.
advertisement
काय आहे काळाराम मंदिराचा इतिहास?
श्री काळाराम मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. राम सव्वा दोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचं बांधकाम करण्याची आज्ञा केली होती. याच काळात ओढेकर यांना ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा रामाचा स्वप्नदृष्टांत झाल्याचं बोललं जातं.
Ram Navami 2025: जीवनात येईल समृद्धी! रामनवमीला अशी करा पूजा, पाहा मुहूर्त आणि विधी
काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होतं. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडात मिळालेल्या आहेत. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरुन दगड आणण्यात आले. या डोंगरावर राम रात्री निद्रा करण्यासाठी जात होते, अशी अख्यायिका आहे.
रामशेज या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याचं परीक्षण केलं गेलं. पूर्ण बांधकाम या दगडांपासून झालंय. 1778 ते 1790 या कालखंडात हे मंदिर पूर्ण झालंय. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला 23 लाख रुपये खर्च आला होता. दरवर्षी देशभरातून हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
श्रीरामाचं वास्तव्य
श्रीरामांनी वनवासातील बहुतांश काळ याच भागात घालवल्याचे सांगितले जाते. तसेच वनवासाच्या काळात भगवान श्रीराम हे माता सीता आणि बंधू लक्ष्मणासोबत पंचवटी परिसरातच वास्तव्यास होते. तसेच या ठिकाणच्या अनेक पौराणिक कथा देखील आहेत.
कुठे आहे काळाराम मंदिर
श्री काळाराम मंदिर हे पंचवटी मध्ये आहे. नाशिक शहरातील मुख्य बसस्थानकापासून 3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. खासगी किंवा सरकारी बसने अथवा वाहनाने तुम्ही तिथपर्यंत पोहचू शकता.