सोलापूर : गुढीपाडव्याच्या पार्श्वभुमीवर प्रती वर्षी सोलापूर ते श्रीशैल दरम्यान नंदीध्वज पदयात्रा काढण्यात येते. प्रतिवर्षी दोन नंदीध्वज श्रीशैल इथं जातात. याठिकाणी धार्मिक विधी आणि कार्यक्रम पार पडल्यानंतर ते सोलापूरला पुन्हा परततात. प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही 13 मार्च ते 6 एप्रिल 2024 दरम्यान या नंदीध्वज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र दोन ऐवजी यंदा पाच नंदीध्वज निघणार आहेत. त्यासाठी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात या नंदीध्वजांची पूजा करण्यात आली. काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यावेळी उपस्थित होते.
advertisement
हिरेहब्बू वाड्यात पूजन
पारंपारिक मार्गानं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड तसेच पालखीसह हे नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात आले. वाटेत ठिकठिकाणी पालखी तसचं नंदीध्वजांच मनोभावे स्वागत करण्यात येऊन पूजन करण्यात आलं आणि दर्शन घेण्यात आलं. हिरेहब्बू वाड्यात ही हिरेहब्बू परिवाराच्या वतीनं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचं तसचं पाच ही नंदीध्वजांचं मनोभावे पूजन करण्यात आलं. यावेळी संबळच्या निनादानं आणि हलग्यांच्या कडकडाटानं वातावरण चैतन्यमय बनलं होत.
Pandharpur News: पंढरीच्या विठ्ठलाचे दिवसातून फक्त 5 तास मुखदर्शन; 15 मार्चपासून होणार मोठे बदल
28 वर्षांनी जुळून आला योग
दरम्यान, तब्बल 28 वर्षींनी पाचही नंदीध्वजांची पदयात्रा श्रीशैलला जाण्याचा योग जुळून आल्याची माहिती यावेळी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली. हिरेहब्बू वाड्यातील पूजनानंतर कपिलसिध्द श्री मल्लिकार्जुन यांचं दर्शन घेऊन जुने सिध्देश्वर मंदिराकडं पाच ही नंदीध्वज सवाद्य मिरवणुकीनं मार्गस्थ झाले. याठिकाणी विश्रांती आणि महाप्रसाद होऊन ते पुढं मार्गस्थ झाले. यावेळी नंदीध्वजधारक आणि भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. नंदीध्वज पदयात्रेच्या माध्यमातून श्रीशैल इथं जाण्याची संधी मिळणं ही भक्तगणांच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट मानली जाते. त्यामुळं मोठ्या संख्येनं भक्तगण या पदयात्रेत सहभागी होतात.