गुप्त नवरात्री म्हणजे काय?
अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातून चार वेळा नवरात्र येते. माघ आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला 'गुप्त नवरात्री' म्हणतात. या नवरात्रीत देवीची पूजा अत्यंत गुप्तपणे केली जाते. ही नवरात्र प्रामुख्याने साधक, तांत्रिक आणि अघोरी लोकांसाठी 'सिद्धी' प्राप्त करण्यासाठी महत्त्वाची असते. यात सार्वजनिक उत्सव किंवा मोठ्या आवाजात गाणी नसतात, तर एकांतात केलेली साधना असते.
advertisement
2026 मधील तिथी आणि मुहूर्त
यावर्षी माघ महिन्यातील गुप्त नवरात्र 19 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत ही नवरात्री साजरी केली जाईल, ज्यामध्ये देवी दुर्गा आणि दहा महाविद्यांची गुप्त पूजा केली जाते; घटस्थापनेसाठी 19 जानेवारी रोजी सकाळी 7:14 ते 10:46 किंवा दुपारी 12:11 ते 12:53 पर्यंतचा मुहूर्त शुभ आहे.
कशी साजरी केली जाते
गुप्त नवरात्रीमध्ये 'नऊ दुर्गां'ऐवजी प्रामुख्याने 'दहा महाविद्या' यांची पूजा केली जाते. यात काली, तारा, त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला यांचा समावेश होतो. मध्यरात्रीची पूजा या काळात विशेष फलदायी मानली जाते. या 9 दिवसांत सात्त्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. तसेच केस आणि नखे कापू नयेत असे मानले जाते.
आवर्जून करा 'हे' एक काम
गुप्त नवरात्रीच्या काळात कोणाचेही वाईट चिंतू नका. दररोज संध्याकाळी देवीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून "ॐ दुं दुर्गायै नमः" या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
