विशाल कुलकर्णी गुरुजी यांनी सांगितले की, गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती मानला जातो. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पाची पूजा करण्याची परंपरा आहे. आपल्या लाडक्या गणरायाचे एकूण तीन अवतार मानले जातात आणि या तिन्ही अवतारांचे जन्मदिन वेगवेगळ्या तिथींना साजरे केले जातात. पहिला अवतार वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.
advertisement
हा दिवस पुष्टीपती विनायक जयंती म्हणून ओळखला जातो. दुसरा अवतार भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरा होतो. याच दिवशी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडपांमध्ये गणरायाचे आगमन होते आणि भक्तीभावाने पूजन केले जाते. तिसरा आणि विशेष महत्त्वाचा अवतार माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो. हा दिवस माघी श्रीगणेश जयंती म्हणून ओळखला जातो.
तारीख आणि पूजेचा मुहूर्त
माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी आणि तिळकुंद चतुर्थी अशा नावांनीही ओळखले जाते. यंदा ही चतुर्थी 22 जानेवारीला रात्री 2.48 वाजता सुरू होणार असून 23 जानेवारीला रात्री 2.29 वाजेपर्यंत राहणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी सकाळी 11.28 ते दुपारी 1.42 असा शुभ वेळ देण्यात आली आहे. या काळात भाविक गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून विधीपूर्वक पूजा करू शकतात.
महोत्कट विनायकाचा अवतार
माघ महिन्यात साजरी होणारी गणेश जयंती ही गणपती बाप्पाचा जन्मदिन मानला जातो. पुराणकथेनुसार कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या पोटी गणरायाने महोत्कट विनायक या रूपात जन्म घेतला होता. देव आणि मानवांना त्रास देणाऱ्या देवांतक व नरांतकाचा नाश करण्यासाठी हा अवतार झाला, असे सांगितले जाते.





