मुंबई - दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. याच दिवाळीच्या सणाला सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनचे असे विशेष महत्त्व आहे. पण दिवाळीत जसे लक्ष्मीचे महत्त्व सांगितले जाते त्याप्रमाणे अलक्ष्मीचीही कथा आहे. जेथे लक्ष्मी नाही तेथे अलक्ष्मी उदयास येते, असे पद्म पुराणात सांगतिले आहे. त्यामुळे अलक्ष्मीची कथा नेमकी काय आहे, याचबाबत आपण जाणून घेऊयात.
advertisement
या निमित्ताने लोकल18 च्या टीमने पौराणिक विद्या अभ्यासक सूरज सदानंद म्हशेळकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्ही बहिणी आहेत. समुद्रमंथनातून दोघींची उत्पत्ती झाली. आधी अलक्ष्मी आली म्हणून तिला ज्येष्ठा म्हटले जाते आणि नंतर लक्ष्मी आली. अलक्ष्मीचे वाहन गाढव आहे आणि हातात झाडू आहे. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे.
लक्ष्मी आणि विष्णू यांचा विवाह होणार होता त्यावेळी लक्ष्मी म्हणाली, जोपर्यंत अलक्ष्मीचा विवाह होणार नाही तोपर्यंत मीसुद्धा विवाह करणार नाही. त्यामुळे विष्णूंनी तिच्यासाठी वर शोधायला सुरुवात केली आणि उद्दालक मुनी यांना विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून त्यांनी अलक्ष्मीसोबत विवाह केला. पण ती त्यांच्या घरात गेली नाही. कारण तिला स्वच्छता आवडत नाही. तिला कचरा, अस्वच्छता आवडते. ज्यांच्या घरी तंटा, वाद, अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मी वास करते, असे सांगतात.
तुमच्या राशीसाठी यंदाची दिवाळी कशी असेल, तुमच्या फायद्याची माहिती
देव अलक्ष्मीला धोकादायक व्यक्तींमध्ये राहण्यासाठी, त्यांना दारिद्र्य आणि दुःख देण्यास पाठवतात. म्हणून ती असुर, अशुभ आणि दु:ख देणारी आहे. आनंदाची देवी लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध अलक्ष्मी आहे. समुद्रमंथनात लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी बाहेर आली.
एकदा अलक्ष्मी घरात शिरली की तिच्यासोबत ईर्ष्या आणि द्वेषबुद्धी घेऊन येते. केरसुणी हे अलक्ष्मीचे आयुध असून तिचे वाहन गाढव आहे. तिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी अश्विन शु. अष्टमीला महालक्ष्मी पूजेच्याआधी ज्येष्ठा या नावाने अलक्ष्मीची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन केले जाते. अलक्ष्मीला ज्येष्ठा म्हटले जाते. काही ठिकाणी तिला सटवाई देखील म्हटले जाते. त्यामुळे घरात सुख, समृद्धी राहावी म्हणून लक्ष्मी पूजनच्या दिवशी अलक्ष्मीचे शस्त्र असलेल्या झाडूची पूजा केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
सूचना - ही माहिती धर्म आणि शास्त्राच्या आधारे आचार्यांशी बोलून लिहिली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 मराठी कोणताही दावा करत नाही.