बेंगळुरू: दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या दिवशी विदर्भचा युवा फलंदाज दानिश मालेवार (Danish Malewar) याने इतिहास रचला. सेंट्रल झोनकडून खेळणाऱ्या दानिशने नॉर्थ-ईस्टविरुद्ध पहिल्या दिवशी नाबाद 198 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्याने आपले पहिले द्विशतक पूर्ण केले आणि 203 धावांवर माघारी परतला. दानिशने या खेळीत 222 चेंडूत 36 चौकार आणि 1 षटकार लगावला.
advertisement
मोठा निर्णय, धक्का देणारा ठरला
या खेळीत दानिश मालेवारने फक्त द्विशतकच गाठले नाही तर एक धाडसी आणि आश्चर्यकारक निर्णय घेतला. 21 वर्षीय दानिशचा याआधीचा सर्वोत्तम स्कोर 153 धावा होता. जो त्याने गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात केला होता. मात्र शुक्रवारी मैदानात उतरल्यावर त्याने पहिल्याच षटकात चौकार मारून स्कोर 200 च्या पुढे नेला. आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक साकारल्यानंतर दानिशने रिटायर आउट होण्याचा निर्णय घेतला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळाडू क्वचितच अशा पद्धतीने माघारी फिरतात. त्यामुळे हा निर्णय सगळ्यांनाच थोडा धक्का देणारा ठरला. या निर्णयामुळे दानिशने स्वतःला विजय मर्चंट आणि श्रीलंकेचे दिग्गज अरविंद डी-सिल्वा यांच्या विशेष क्लबमध्ये सामील करून घेतले.
क्रेग स्पेरमॅन होते शेवटचे फलंदाज
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतक करून रिटायर आउट होणारे शेवटचे फलंदाज होते क्रेग स्पेरमॅन. त्यांनी 2005 साली ग्लोसेस्टरशायरकडून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीविरुद्ध खेळताना 216 धावा करून रिटायर आउटचा निर्णय घेतला होता. आजही फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतकानंतर रिटायर आउट झालेल्यांमध्ये त्यांचा स्कोर सर्वाधिक मानला जातो.
भारतीय खेळाडूंबाबत बोलायचे झाले तर दानिशच्या आधी विजय मर्चंट यांनी तब्बल 81 वर्षांपूर्वी असा निर्णय घेतला होता. 1944 साली क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून सेनना विरुद्ध खेळताना मर्चंट 201 धावांवर असतानाच स्वतःहून माघारी गेले होते.
अटापट्टू एकमेव टेस्ट खेळाडू
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक करून रिटायर आउट होणारा एकमेव खेळाडू म्हणजे श्रीलंकेचा मर्वन अटापट्टू होय. याशिवाय श्रीलंकेचे महान फलंदाज अरविंद डी-सिल्वा यांनी 1994-95 मध्ये हरारे येथे मॅशोनालँड कंट्री डिस्ट्रिक्टविरुद्ध 202 धावा करून रिटायर आउट होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना वगळता टेस्ट क्रिकेटमध्ये अजून कोणत्याही फलंदाजाने इतकी मोठी खेळी करून स्वतःहून माघारी जाण्याचा धाडसी निर्णय घेतलेला नाही.