अर्जुन आणि समित हे दोघेही भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:चं स्थान मिळवण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत. कर्नाटकमधील अलूर येथील एका स्थानिक स्पर्धेमध्ये अर्जुन आणि समित एकमेकांविरुद्ध खेळत होते. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने समित द्रविडला आऊट केलं. या सामन्यात समित द्रविड हा केएससीए सेक्रेटरी इलेव्हनकडून खेळत होता.
थिमप्पिया मेमोरियल टूर्नामेंटमध्ये, समित द्रविडने 26 बॉलमध्ये 9 रनची खेळी केली, ज्यात त्याने दोन फोरही मारल्या. समित द्रविडने एक फोर लाँग-ऑफच्या दिशेने आणि दुसरी कव्हरच्या दिशेने गेली. पण यानंतर अर्जुन तेंडुलकरने समितची विकेट घेतली. समित द्रविड या सामन्यात कॅच आऊट झाला. अर्जुन तेंडुलकर आणि समित द्रविड यांच्या वयातही बरंच अंतर आहे. अर्जुन तेंडुलकर हा 25 वर्षांचा तर समित द्रविड हा फक्त 19 वर्षांचा आहे.
advertisement
डावखुरा फास्ट बॉलर आणि ऑलराऊंडर असलेल्या अर्जुनने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तर समित द्रविड वडिलांप्रमाणेच तंत्रशुद्ध बॅटर होण्याचं स्वप्न पाहत आहे. समित द्रविडच्या करिअरची नुकतीच सुरूवात झाली आहे.
कर्नाटकातील काही आघाडीच्या स्थानिक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. टीम इंडियाकडून इंग्लंड दौऱ्यात खेळलेला करुण नायर आणि प्रसिद्ध कृष्णा या सीरिजमध्ये खेळले. या स्पर्धेकडे 2025-26 रणजी ट्रॉफीच्या हंगामाआधीचं सराव सत्र म्हणून पाहिलं जात आहे.
अर्जुन तेंडुलकर स्थानिक क्रिकेट खेळण्यासाठी मुंबई सोडून गोव्याला गेला आहे. तसंच मागच्या बऱ्याच काळापासून अर्जुन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आहे. रणजी ट्रॉफीचा मोसम सुरू व्हायच्या आधी निवड समिती या स्पर्धेकडे बारकाईने लक्ष ठेवत आहे.