रोहित आणि विराट यांना 'B' श्रेणीत स्थान
दैनिक जागरणने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या करारानुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना 'B' श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी हे दोन्ही दिग्गज खेळाडू 'A+' श्रेणीचा भाग होते. रोहितने कसोटी आणि विराटने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याने त्यांच्या ग्रेडमध्ये हा बदल करण्यात आल्याचे समजते. टी-20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव यालाही 'B' श्रेणीतच ठेवण्यात आले असून त्याच्यासोबत हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांचाही समावेश आहे.
advertisement
शुभमन 'A' श्रेणीमध्ये सामील
दुसरीकडे, भविष्यातील नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून शुभमन गिलला मोठी बढती देण्यात आली आहे. शुभमन गिल आता 'A' श्रेणीमध्ये सामील झाला असून त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांना या सर्वोच्च श्रेणीत स्थान मिळाले आहे. सध्याच्या घडीला या तीनच खेळाडूंना 'A' श्रेणीत स्थान देऊन बीसीसीआयने आगामी काळातील महत्त्वाच्या खेळाडूंचे संकेत दिले आहेत.
'C' श्रेणीमध्ये 16 खेळाडूंचा समावेश
तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 'C' श्रेणीमध्ये सर्वाधिक 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रिंकू सिंह, टिळक वर्मा, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंह यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकलेल्या नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा यांसारख्या युवा खेळाडूंनाही प्रथमच केंद्रीय करारात स्थान मिळाले आहे.
महिला क्रिकेटपटूंच्या यादीत महत्त्वाचे बदल
दरम्यान, महिला क्रिकेटपटूंच्या यादीतही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांना 'A' श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत जेमिमाह रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा या खेळाडूंनाही सर्वोच्च स्थान मिळाले आहे. बीसीसीआयचा हा नवा करार 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार असून, याद्वारे खेळाडूंच्या कामगिरीचे आणि उपलब्धतेचे मूल्यमापन करण्यात आले आहे.
