नवी दिल्ली : दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याप्रकरणी दिग्वेश राठी, नितीश राणा, अमन भारती, सुमित माथुर आणि कृष यादव यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी शनिवारी दिली.
advertisement
ही घटना शुक्रवारी संध्याकाळी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली सुपरस्टार्स आणि वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यात घडली. सामन्यात राणा आणि राठी यांच्यात वाद झाला. राठीने गोलंदाजीच्या वेळी चेंडू टाकलाच नाही आणि पुन्हा चेंडू टाकण्यासाठी गेला. त्यावेळी राणा स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर राठी परत गोलंदाजीसाठी आले तेव्हा राणा मागे हटला.
यानंतर राणाने राठीच्या पुढच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळून डीप पॉइंटच्या वरून षटकार ठोकला. त्यामुळे वातावरण थोडे तंग झाले. त्यानंतर राणा रागाने राठीकडे धावत जाताना दिसला. अंपायर गायत्री वेणुगोपालन आणि जवळच्या क्षेत्ररक्षकांनी लगेच हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले. राठी काहीतरी पुटपुटत निघून गेले. राणा यांच्यावर अनुच्छेद 2.6 (स्तर 1) अंतर्गत आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे सामन्याच्या फीच्या 50 टक्के दंडाची शिक्षा झाली आहे. या अनुच्छेदाखाली अश्लील, आक्षेपार्ह किंवा अपमानजनक हावभावांचा वापर केल्यास कारवाई केली जाते.
दिग्वेश राठी याच्यावर आयपीएल 2025 मध्येही नोटबुक स्टाईल सेलिब्रेशनमुळे अनेक दंड झाले होते. त्याच्यावर खेळभावनेच्या विरुद्ध वर्तनाबद्दल अनुच्छेद 2.2 (स्तर 2) अंतर्गत सामन्याच्या फीच्या 80 टक्के दंडाची शिक्षा करण्यात आली आहे.
या सामन्यात आणखी एक वाद झाला. जेव्हा राणाच्या संघातील खेळाडू कृष यादवची अमन भारती आणि नंतर आणखी एका खेळाडूसोबत तीव्र वादावादी झाली. परिणामी कृष याच्यावर अनुच्छेद 2.3 (स्तर 2) अंतर्गत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामन्याच्या फीच्या 100 टक्के दंडाची शिक्षा झाली आहे. हा दंड विरोधी खेळाडूकडून शिविगाळ आणि खेळाडूकडे बॅट दाखवल्यानंतर ऐकू आलेल्या अश्लील शब्दप्रयोगामुळे ठोठावण्यात आला.
अमन भारती याच्यावर सामन्यात अश्लील भाषा वापरल्याबद्दल अनुच्छेद 2.3 (स्तर 1) अंतर्गत सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंडाची शिक्षा झाली. तर सुमित माथुर याच्यावर अनुच्छेद 2.5 (स्तर 1) अंतर्गत सामन्याच्या फीच्या 50 टक्के दंडाची कारवाई झाली आहे. हा सामना साऊथ दिल्ली सुपरस्टार्स आणि वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यात खेळला गेला. साऊथ दिल्ली सुपरस्टार्सने 202 धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्ट दिल्लीने कर्णधार नितीश राणाच्या नाबाद 134 धावांच्या खेळीच्या जोरावर (55 चेंडू, 15 षटकार, 8 चौकार) 17.1 षटकांत 3 गडी गमावून 202 धावा करत सामना 7 गडी राखून जिंकला.