भारतीय क्रिकेटपटूंना समन्स
युवराज सिंगला 23 सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. हा खटला ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. आतापर्यंत दिल्लीत या प्रकरणात चार माजी भारतीय क्रिकेटपटूंना समन्स बजावण्यात आले आहे. युवराज किंवा उथप्पाने या बेटिंग अॅपच्या प्रमोशनमध्ये त्यांच्या चेहऱ्यांचा वापर केला आणि त्या बदल्यात काही पैसे घेतले का? याची ईडी चौकशी करत आहे.
advertisement
युवराज सिंगची क्रिकटमधली संपूर्ण कुंडली?
युवराज सिंग हा भारतीय क्रिकेटमधील एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. युवराज सिंगने 2000 मध्ये केनियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर 2003 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सुरुवातीपासूनच एक उत्कृष्ट फलंदाज आणि उपयुक्त डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. टी20 विश्वचषक स्पर्धेत त्याने इंग्लंडविरुद्ध एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा ऐतिहासिक विक्रम केला. हा टी20 क्रिकेटमधील पहिलाच विक्रम होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे 30 बॉलमध्ये 70 रन महत्त्वपूर्ण ठरले, ज्यामुळे भारताने तो विश्वचषक जिंकला.
2011 च्या वर्ल्ड कपचा हिरो
2011 एकदिवसीय विश्वचषक युवराज सिंगच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. युवराजने या विश्वचषकात 362 रन आणि 15 विकेट्स घेऊन भारताला विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या या ऑलराऊंडर कामगिरीबद्दल त्याला 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'चा पुरस्कार मिळाला. 2011 च्या विश्वचषकादरम्यान त्याला कर्करोगाचे निदान झालं होतं, तरीही तो खेळत राहिला. यानंतर त्याने कर्करोगावर यशस्वी मात केली.
मैदानात दमदार पुनरागमन
कर्करोग झाल्यानंतर देखील युवीने पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दमदार पुनरागमन केलं. त्याने आयपीएलमध्ये अनेक टीम्सकडून खेळला आहे. 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि 2019 मध्ये मुंबई इंडियन्स या दोन्ही टीम्सने आयपीएलचे विजेतेपद मिळवताना तो टीमचा भाग होता. 2017 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्याने 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. युवराज सिंगला 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.