रांची : झारखंडची राजधानी रांची येथे जेएससीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडच्या दरम्यान चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी आकाशदीप याने तीन गडी बाद करुन त्याने चमक दाखवली. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की, त्याच्या वडिलांना आकाशदीपने किक्रेटर नव्हे तर पोलीस कॉन्स्टेबल व्हावे, असे वाटत होते.
आकाशच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याचा मित्र वैभव याने महत्त्वाची भूमिका बजावली. लोकल18 शी बोलताना वैभव म्हणाला की, आमच्या जिल्ह्यात अशी मानसिकता आहे की, जोपर्यंत सरकारी नोकरी मिळत नाही, तोपर्यंत तुमचे आयुष्य सेट होणार नाही. सरकारी नोकरी म्हणजे सर्वस्व असे मानले जाते. त्यामुळे आकाशच्या वडिलांचेही असेच विचार होते. आपल्या मुलाने सरकारी नोकरी करून आपले जीवन जगावे, अशी त्यांची इच्छा होती.
advertisement
पोलीस कॉन्स्टेबल करण्याचे स्वप्न -
वैभवने पुढे सांगितले की, आकाशदीपने पोलीस कॉन्स्टेबल व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आकाशची उंची आणि त्याची शरीरयष्टी चांगली असल्याने त्यांना असे वाटले की, तो पोलीसमध्ये चांगले करिअर करू शकतो. त्यामुळे ते आकाशला फॉर्म भरायला नेहमी सांगायचे. पण आकाशला या नोकरीमध्ये अजिबात रस नव्हता. यासाठी तो नेहमी रिक्त फॉर्म जमा करुन द्यायचा. पण त्याने पूर्ण फॉर्म भरला आहे, असे वडिलांना वाटायचे.
आकाश सुरुवातीपासूनच एक गोष्ट सांगायचा की, मी मोठा व्यावसायिक किंवा क्रिकेटरच होईल पण सरकारी नोकरीत चुकूनही जाणार नाही. कारण माझे मन त्यामध्ये अजिबात लागत नाही. ज्याप्रमाणे तो बोलला होता, त्याप्रमाणे तो आज आपले स्वप्न जगत आहे.
अनोखा विवाहसोहळा, फक्त 1 रुपया आणि नारळ घेऊन अभिनेत्याने केलं लग्न, वधूने दिली ही प्रतिक्रिया..
लहानपणी आला तो अनुभव -
वैभवने सांगितले की, आकाश जेव्हा क्रिकेट खेळायचा तेव्हा सुरुवातीला गल्लीतील मुलंही त्याच्यासोबत खेळायची. पण इतर मुलांचे पालक म्हणायचे की आकाशसोबत खेळू नका. नाहीतर तुम्ही बिघडून जाल. तो दिवसभर क्रिकेट खेळतो. त्याच्यासोबत राहिल्यास तुमचेही करिअर बरबाद होईल. पण, आकाशला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत नव्हता. त्याने नेहमी आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिकपणा दाखवला आणि पदार्पणाच्या सामन्यातील त्याची उत्कृष्ट कामगिरी हा त्याचाच परिणाम आहे.
