टीम इंडियाच्या इंग्लंडमधल्या या कामगिरीचं जसप्रीत बुमराहने कौतुक केलं, पण ट्रोलर्सनी बुमराहवरच निशाणा साधला आहे. बुमराह इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 3 टेस्ट खेळल्या. ओव्हलमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये बुमराह खेळला नाही. याच सामन्यात सिराजने 9 विकेट घेतल्या, ज्याबद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजनंतर बुमराहने टीम इंडियाचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे. 'आम्ही या थरारक सामन्यातून आणि रोमांचक टेस्ट सीरिजमधून सुंदर आठवणी घेऊन आलो आहोत, आता मी पुढच्या प्लानचा विचार करत आहे', असं बुमराह त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला.
advertisement
बुमराहच्या याच पोस्टवरून चाहते त्याच्यावर निशाणा साधत आहेत. बुमराहने त्याच्या पोस्टमध्ये मोहम्मद सिराजचं नावही घेतलं नसल्यामुळे ट्रोलर्सनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने तर बुमराह सिराजला घाबरल्याची टीका केली आहे. सिराजने इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्टमध्ये 23 विकेट घेतल्या. सिराज या सीरिजमधला सर्वाधिक विकेट घेणारा बॉलरही ठरला, तसंच त्याने सर्व 5 मॅच खेळून सर्वाधिक ओव्हरही टाकल्या. यावरूनही चाहत्यांनी बुमराहवर निशाणा साधला आहे.
या सीरिजमध्ये बुमराह 3 मॅच खेळला, ज्यातल्या 2 सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला तर एक मॅच ड्रॉ झाली. बुमराह सीरिजच्या ज्या 2 मॅच खेळला नाही, त्यात भारताने विजय मिळवला, यावरूनही बुमराहला लक्ष्य केलं जात आहे. अखेर भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर बुमराहसाठी मैदानात उतरला. बुमराह ज्या टेस्ट खेळला नाही, त्यात भारताचा विजय झाला हा निव्वळ योगायोग आहे, असं सचिन म्हणाला.