25 डिसेंबर रोजी टेस्ट केल्यानंतर श्रेयस सीओई येथे रिहॅब करत आहे. त्याने त्याच्या बॅटिंग आणि धावण्याच्या सरावात चांगली कामगिरी केली असली तरी, तो तिन्ही फिटनेस टेस्टमध्ये कमी पडला, ज्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक असलेले फिटनेसचे गुण त्याने गमावले. टीम निवडीसाठी फक्त काही दिवस शिल्लक असल्याने, तो 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे सीरिजला मुकण्याची शक्यता आहे.
advertisement
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दुखापतीमुळे श्रेयसने 6 किलो वजन कमी केले आणि त्यामुळे त्याची फिटनेस लेव्हल आवश्यक गुणांपेक्षा कमी झाली. 'ऑस्ट्रेलियातील दुखापतीनंतर त्याच्या बॅटिंगमध्ये कोणतीही समस्या नाही पण त्याने सुमारे 6 किलो वजन कमी केले. त्याचे वजन काही प्रमाणात सुधारले असले तरी, स्नायूंच्या वस्तुमानात घट झाली आहे ज्यामुळे त्याच्या फिटनेसच्या पातळीवर आणखी परिणाम झाला आहे,' असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
"मेडिकल टीम कोणताही धोका पत्करणार नाही कारण तो वनडे टीमचा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे आणि सध्या त्याचं पूर्णपणे फिट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिज आधी निवड समितीला आणि टीम व्यवस्थापनाला त्याच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली जाईल," असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
श्रेयस अय्यर 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात झालेल्या गंभीर दुखापतीतून सावरत आहे. अॅलेक्स कॅरीचा कॅच घेण्याच्या प्रयत्नात श्रेयसला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याच्या प्लीहाला दुखापत झाली आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्याला सिडनीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शस्त्रक्रिया करण्यात आली.
श्रेयसने या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत बॅटिंगचा सराव पुन्हा सुरू केला आणि आयपीएल 2026 च्या लिलावासाठी तो पंजाब किंग्जसोबत अबू धाबीलाही गेला. न्यूझीलंड मालिकेची तयारी करण्यासाठी तो जानेवारीच्या सुरुवातीला विजय हजारे ट्रॉफीचे काही सामने खेळण्याचा विचार करत होता. पण, आता त्याला किमान 9 किंवा 10 जानेवारीपर्यंत सीओईमध्ये राहावे लागू शकते.
