मुंबई: टी-20 क्रिकेटमध्ये मंगळवारी इतिहास रचला गेला. इंडोनेशियाचा 28 वर्षीय वेगवान गोलंदाज गेडे प्रियंदाना याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एक अद्वितीय कामगिरी केली. त्याने एका एकाच षटकात पाच बळी घेणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. ही कामगिरी केवळ पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही यापूर्वी कधीच घडलेली नव्हती.
advertisement
याआधी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एका षटकात चार बळी घेण्याचा पराक्रम काही दिग्गज गोलंदाजांनी केला होता. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, अफगाणिस्तानचा राशिद खान आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर यांसारख्या नावांचा त्यात समावेश आहे. मात्र एका षटकात पाच बळी घेण्याचा पराक्रम कोणालाही साधता आला नव्हता आणि हाच विक्रम प्रियंदानाने मोडीत काढला.
ही ऐतिहासिक कामगिरी कंबोडियाविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात घडली. 168 धावांचा पाठलाग करताना कंबोडियाचा संघ 15 षटकांनंतर 5 बाद 106 धावांवर होता. त्याच वेळी 16व्या षटकात गोलंदाजीस आलेल्या प्रियंदानाने अक्षरशः सामना एका षटकात फिरवून टाकला.
या षटकाच्या पहिल्याच तीन चेंडूंवर त्याने हॅट्ट्रिक साधली. शाह अबरार हुसेन, निर्मलजित सिंग आणि चंथोउन रथानक हे तीन फलंदाज सलग बाद झाले. त्यानंतर एका चेंडूवर धाव न देता थोडा दिलासा कंबोडियाला मिळाला, मात्र पुढील दोन चेंडूंवर मोंगदारा सॉक आणि पेल वेन्नाक यांनाही तंबूत धाडत प्रियंदानाने आपले पाच बळी पूर्ण केले आणि कंबोडियाचा डाव संपुष्टात आणला.
या संपूर्ण षटकात त्याने फक्त एकच धाव दिली, तीही वाईडमुळे. या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर इंडोनेशियाने हा सामना 60 धावांनी जिंकला.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 4 बळी घेणारे गोलंदाज
श्रीलंकेचा लसिथ मलिंगा (न्यूझीलंडविरुद्ध, 2019)
अफगाणिस्तानचा राशिद खान (आयर्लंडविरुद्ध, 2019)
आयर्लंडचा कर्टिस कॅम्फर (नेदरलँड्सविरुद्ध, 2021)
आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर (इंग्लंडविरुद्ध, 2022)
या सामन्यात इंडोनेशियाच्या विजयाचा पाया मात्र आधीच रचला गेला होता. संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज धर्मा केसुमा याने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद 110 धावा केल्या. त्याच्या 68 चेंडूंच्या खेळीत आठ चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, प्रियंदानाने गोलंदाजीतील या ऐतिहासिक कामगिरीपूर्वी सलामीवीर म्हणून फलंदाजीही केली होती, मात्र त्याला 11 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा करता आल्या.
प्रियंदानाच्या या पराक्रमापूर्वी पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात पाच बळी घेण्याचा विक्रम फक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोन वेळा पाहायला मिळाला होता. बांगलादेशचा अल-अमिन हुसेन याने 2013-14 च्या विजय दिवस टी-20 स्पर्धेत यूसीबी-बीसीबी इलेव्हनकडून खेळताना हा पराक्रम केला होता. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू अभिमन्यू मिथुन याने 2019-20 च्या सैयद मुश्ताक अली करंडक उपांत्य सामन्यात कर्नाटककडून खेळताना ही कामगिरी पुन्हा केली होती.
मात्र आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात पाच बळी घेण्याचा इतिहास प्रथमच रचला गेला आणि त्या इतिहासात गेड़े प्रियंदानाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
