भंडारा : पोलिओमुळे लहानपणीच अपंगत्व आलं. खेडेगावात सोयीसुविधा आणि मार्गदर्शनाचाही अभाव. मात्र, आतला खेडाळू काही स्वस्थ बसु देत नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीतही प्रचंड मेहनत, जिद्द, आणि चिकाटीच्या बळावर राज्यच नाही तर राष्ट्रीय स्पर्धेतही घवघवीत यश मिळवलं. मात्र, आज या व्यक्तीची अवस्था फारच बिकट झाली आहे.
योगेश्वर घाटबांधे असे या व्यक्तीचे नाव आहे. योगेश्वर घाटबांधे हे दिव्यांग असून भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील किटाडी बाजार येथील रहिवासी आहे. योगेश्वर यांनी आतापर्यंत एक-दोन नव्हे तर तब्बल 48 पदके पटकाविली आहेत. भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धेत आपल्या गावाचे नाव सुवर्णाक्षरात कोरले. यामुळे शासनाने योगेश्वर यांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरवही केला. मात्र, आज या खेळाडूवर आपला संसार चालविण्यासाठी दिव्यांग असतानाही ऑटो रिक्षा चालविण्याची वेळ आली आहे.
advertisement
जिंकली तब्बल 18 गोल्ड मेडल :
अडीच हजार लोकवस्तीच्या किटाडीत योगेश राहतात. लहानपणीच त्यांना पोलिओमुळे अपंगत्व आले होते. मात्र, या सर्व विपरीत परिस्थितीवर मात करीत त्यांनी खेळण्याची जिद्द न सोडता कठोर मेहनत घेतली आणि शक्य तितके स्पर्धेत जिंकण्याचे प्रयत्न केले. योगेश्वर यांनी आतापर्यंत 48 पदक पटकाविली असून त्यात 18 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कास्य पदकांचा समावेश आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपंगाच्या 14व्या वरिष्ठ आणि 8व्या कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत त्याने एफ 56 गटात भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक मध्ये कांस्य पदक पटकाविले. कोल्हापुरच्या राज्यस्तरीय अपंग स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रजत पदके पटकावून त्याने जिल्ह्याची मान उंचाविली आहे. योगेश्वर हे आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय, 6 राष्ट्रीय, 16 राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
मंदिराचा जिर्णोद्धार करताना आढळली हजारो वर्षांपूर्वीची ऐतिहासिक मातीची भांडी, काय आहे नेमका इतिहास?
उच्चशिक्षित खेळाडूवर ऑटोरिक्षा चालविण्याची वेळ :
बंगळुरू, चंदीगड, गाझियाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी झाला. उत्तरप्रदेशातील पॅराअॅथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे कर्णधारपद भुषविले. दिव्यांगत्वावर मात करुन त्यांनी खेळात यश मिळविले. यासोबतच योगेश्वर यांनी एमएड पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले आहे. याच्याच बळावर योगेश्वर यांना नोकरी लागेल आणि घरची परिस्थिती सुधारेल, अशी आशा होती. मात्र, अद्यापही त्यांना शासनाकडून कसलीच मदत झालेली नाही. म्हणूनच दिव्यांग खेळाडूंमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
इतक्या उच्चशिक्षित यशस्वी आणि हाडाच्या खेळाडूवर संसार चालविण्यासाठी अपंग असतानाही ऑटोरिक्षा चालविण्याची वेळ आली आहे. याआधी आतापर्यंत त्यांनी अनेक लोकप्रतिनिधींशी संपर्क केला. मात्र, त्यांना फक्त आश्वसने देण्यात आली. त्या आश्वासनांचं पुढे काहीच झालं नाही. त्यांना अजूनही नोकरी मिळाली नाही. विशेष म्हणजे नोकरी नसल्याने आतापर्यंत त्यांचे लग्नही झालेले नाही. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन त्यांनी ती रिक्षा घेतली आहे. ते सध्या आपले भाऊ आणि वहिनीसोबत राहतात. आतातरी शासन आमची परिस्थिती समजून घेऊन मदतीचा हात पुढे करेल, अशीच आशा योगेश्वर आणि कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.