आरसीबीचे सध्याचे मालक 'युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड' (USL) असून त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासूनच नवीन मालकाचा शोध सुरू केला होता. कंपनीच्या मते, क्रिकेट हा त्यांच्या मद्य व्यवसायाचा मुख्य भाग नसल्याने ते हा संघ विकून व्यवसायाचे धोरणात्मक नियोजन करत आहेत.
तसेच, आरसीबीच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना झालेल्या एका दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ही विक्री प्रक्रिया अधिक वेगाने पुढे सरकली आहे. विशेष म्हणजे, अदार पूनावाला यांच्यासोबतच 'KGF' फेम होमबाले फिल्म्स देखील हा संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत असल्याचे समजते.
दुसरीकडे, आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक चिंतेची बातमी आहे. हा संघ आपले घरगुती सामने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमऐवजी पुणे, मुंबई किंवा रायपूर येथे हलवण्याच्या विचारात आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने त्यांना बेंगळुरूमध्येच राहण्याची विनंती केली असली, तरी सुरक्षा आणि इतर तांत्रिक कारणांमुळे संघ व्यवस्थापन अद्याप द्विधा मनस्थितीत आहे. आरसीबी सध्या आयपीएलचा गतविजेता संघ असून, मालकी हक्काच्या या बदलामुळे संघाच्या भविष्यातील रणनीतीत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अदार पूनावाला यांनी एक्सवर एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी आरसीबी संघ विकत घेण्यासाठी आपण 'बळकट आणि स्पर्धात्मक' बोली लावणार असल्याचे जाहीर केले आहे. आरसीबी हा आयपीएलमधील सर्वोत्तम संघांपैकी एक असून आगामी काही महिन्यांत ते अधिकृतपणे खरेदीची प्रक्रिया पार पाडतील. त्यामुळे आता अदार पुनावाला खरंच आरसीबीला खरेदी करतात का? हे येणाऱ्या काळात समजणार आहे.
