मुंबईचा क्रायसिस मॅन
सिद्धेश लाड हा रणजी ट्रॉफीच्या या मोसमात मुंबईचा क्रायसिस मॅन ठरला आहे. यंदाच्या रणजी मोसमात सिद्धेश लाड मुंबईचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे, त्याने आतापर्यंत 5 सामन्यांच्या 7 इनिंगमध्ये 88.33 च्या सरासरीने 530 रन केले आहेत, ज्यामध्ये 3 शतकांचा आणि एका अर्धशतकांचा समावेश आहे.
सिद्धेश लाडचे वडील दिनेश लाड हे टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा तसंच शार्दुल ठाकूरचे प्रशिक्षक आहेत. मुंबईच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सिद्धेशने स्वत:चं स्थान निर्माण केलं. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करणारा सिद्धेश लाड हा मुंबईच्या टीमसाठी क्रायसिस मॅन आहे. ठोस डिफेन्स आणि स्थिर टेम्परामेंटमुळे सिद्धेश मुंबईच्या इतर महान खेळाडूंप्रमाणेच खडूस बॅटर बनला.
advertisement
सिद्धेशला पहिली मोठी ओळख मिळाली ती टोयोटा युनिव्हर्सिटी चॅम्पियनशीपमध्ये, या स्पर्धेत तो वेस्टर्न वुल्व्हज टीमचा कर्णधार होता. वयोगटातील क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने 2013 साली रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून पदार्पण केलं, त्यानंतर त्याने मुंबईला अनेक मॅच जिंकवून दिल्या. 2015-16 च्या रणजी फायनलमध्ये टेल एंडर्ससोबत खेळताना सिद्धेशने महत्त्वपूर्ण 88 रनची खेळी केली.
2017-18 च्या मोसमात त्याने 7 सामन्यांमध्ये 652 रन केल्या. या मोसमात तो मुंबईचा टॉप रन स्कोरर होता. मुंबईसाठी हा मोसम निराशाजनक ठरला तरी सिद्धेशच्या कामगिरीचं मात्र कौतुक झालं. दुलीप ट्रॉफीमध्येही सिद्धेश लाडने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. 2015 साली त्याला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून टीममध्ये संधी मिळाली, पण स्वत:ची डिफेन्सिव्ह छाप बदलता न आल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित स्थान मिळू शकले नाही.
