शुक्रवारी दुपारी सुमारे 2:50 वाजता काय घडलं?
शुक्रवारी दुपारी सुमारे 2:50 वाजता तेजपाल सिंह हे त्यांच्या कारमध्ये जगराओं येथील पार्किंग क्षेत्रात उभे होते. त्याच वेळी दोन गाड्यांमधून सात ते आठ तरुण तिथे आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तेजपाल यांच्या कारचा हल्लेखोरांच्या एका गाडीला किरकोळ धक्का लागला, ज्यातून वादाची सुरुवात झाली. मात्र, या किरकोळ वादाचे रूपांतर लवकरच एका भयानक हत्याकांडात झाले. हल्लेखोरांनी तेजपाल यांना घेरले आणि सुमारे 20 मिनिटे त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तेजपाल यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण हल्ला रोखता आला नाही.
advertisement
तेजपालच्या छातीत गोळी झाडली
अखेरीस, जाताना एका आरोपीने आपली पिस्तुल (Pistol) काढली आणि तेजपाल यांच्या छातीत गोळी झाडली. गोळी लागताच तेजपाल जागेवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर कायद्याचे उल्लंघन करत त्यांच्या गाड्यांमधून पळून गेले. घटनेनंतर घटनास्थळाजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयाबाहेर एकच गोंधळ उडाला. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना सुरुवातीचे पुरावे मिळवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे पोलीस सध्या आजूबाजूच्या इतर कॅमेऱ्यांची फुटेज तपासत आहेत.
सिद्धू मूसेवालाच्या हत्येशी संबंध?
गोळीबाराची ही घटना 2022 मध्ये झालेल्या पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवालाच्या हत्येशी अनेक बाबतीत मिळतीजुळती असल्याचं समोर येत आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये कारमध्ये असलेल्या व्यक्तीवर अचानक हल्ला, गोळीबार आणि त्यानंतर हल्लेखोरांचे फरार होणे अशा गोष्टींमध्ये साधर्म्य आढळते. त्यामुळे हा केवळ योगायोग आहे की गँगवारचा नवा पॅटर्न असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन सख्ख्या भावांचे वैमनस्य
दरम्यान, एसएसपी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी असलेल्या दोन सख्ख्या भावांचे तेजपाल यांच्यासोबत जुने वैमनस्य होते आणि यापूर्वीही त्यांच्यात दोन ते तीन वेळा हाणामारी झाली होती. मात्र, यापैकी कोणत्याही भांडणाची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली नव्हती. हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं स्थापन केली असून ठिकठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
