एशियन गेम्समध्ये भालाफेक प्रकारात पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने असं काही केलं की त्यामुळे भारतीयांच्या मनात त्याच्याबद्दलचा अभिमान आणखी वाढला. नीरज चोप्रा गोल्ड पटकावल्यानंतर ट्रॅकवरच होता. तो रिलेच्या शर्यतीतील सहभागी भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी थांबला. जेव्हा रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावलं तेव्हा नीरजने सर्व एथलिट्ससोबत विजयाचा आनंद साजरा केला.
स्टेडियममध्ये असलेल्या भारतीय चाहत्यांनी नीरजच्या दिशेने तिरंगा फेकला. नीरज चोप्रासुद्धा तिरंग्यासोबत आपल्या मेडलचा जल्लोष करेल यासाठी तिरंगा चाहत्याने फेकला. मात्र नीरजपासून थोड्या दूर अंतरावर तिरंगा पडत होता. त्यावेळी नीरज चोप्राने धावत जाऊन तिरंगा जमिनीवर पडण्याआधी पकडला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिरंगा झेलल्यानंतर नीरजने तो आपल्या शरीराभोवती गुंडाळला. तिरंग्याचा अवमान होऊ नये यासाठी नीरज चोप्राने जे केलं त्याचं आता सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नीरज चोप्राने एशियन गेम्समध्ये सलग दुसरं सुवर्णपदक जिंकलं. याआधी २०१८ च्या एशियन गेम्समध्ये त्यानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.