पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पहलगाम येथील या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे आणि शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
दानिश कनेरिया यांनी एक्सवर लिहिले की, 'जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची खरोखरच कोणतीही भूमिका नसेल तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अद्याप त्यावर प्रतिक्रिया का दिली नाही?' तुम्ही अचानक तुमच्या सैन्याला हाय अलर्टवर का ठेवले आहे? कारण तुम्हाला सत्य काय आहे हे माहित आहे. तुम्ही दहशतवाद्यांना पोसताय आणि पाठिंबा देताय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी बोचरी टीका दानिश यांनी शाहबाज शरीफवर केली.
दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक खेळाडू होता. पण पाकिस्तान संघात धर्माच्या आधारावर भेदभाव आणि फिक्सिंग घोटाळ्यामुळे त्याची कारकीर्द लवकर संपू्ष्ठात आली होती.दानिश आता पाकिस्तान सोडून गेला आहे. तो त्याच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित झाला आहे. दानिशने अनेक वेळा पाकिस्तान क्रिकेट आणि भारतावर पाकिस्तानने केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांचा उघडपणे विरोध केला आहे.
राजीव शुक्ला काय म्हणाले?
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो आणि आम्ही पिडितांसोबत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. बीसीसीआयने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे थांबवावे का? यावर राजीव शुक्ला म्हणाले की,सरकार जी भूमिका घेईल, त्या भूमिकेसोबत आम्ही आहोत. सरकारच्या वृत्तीमुळे आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही आणि भविष्यातही आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. जेव्हा आयसीसी स्पर्धांचा विचार केला जातो तेव्हा आम्ही आयसीसीच्या सहभागामुळे खेळतो.