विशेष म्हणजे या पर्वाच्या ग्रँड ओपनिंगसाठी बहुप्रतिक्षित ''भूलभुलैया 3'' ची स्टारकास्ट उपस्थित होती. हैदराबाद येथे पार पडलेल्या या सामन्याचा विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांनी मनमुराद आनंद लुटला. हा सामना पाहताना त्यांचा उत्साहही पाहण्यासारखा होता. मागच्या पर्वात तेलुगू टायटन्स हा संघ पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होता. मात्र आजच्या पहिल्याच सामन्यातील विजय त्यांच्यासाठी आशादायी ठरू शकतो. या सामन्याची विशेष बाब म्हणजे प्रो कबड्डीमधील दोन उत्कृष्ट खेळाडू पवन सेहरावत आणि परदीप नरवाल आमनेसामने होते. तथापि, या सामन्यात परदीप नरवालला खास कामगिरी करता आली नाही. याउलट पवन सेहरावतने १३ पॉईंट्स घेऊन या सामन्यातील बेस्ट रेडर ठरला आहे. बेंगलुरु बुल्सच्या सुरिंदरने ५ बळी घेत त्याचं हाय-फाय पूर्ण केलं.
advertisement
दरम्यान, 'भूल भुलैया 3' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कलाकारांच्या उपस्थितीने हैदराबादमधील GMCB इनडोअर स्टेडियममधील वातावरण आणखीनच जबरदस्त झाले होते. कार्तिकने त्याच्या बालपणीचा अनुभव सांगताना म्हटलं, "मी लहानपणी गल्ली कबड्डी खेळायचो पण प्रो कबड्डी लीगमध्ये जशी खेळली जाते तशी नाही. पण ही कबड्डी बघायला खूप मजा येते." तर विद्या बालन पवन सेहरावतला पाठिंबा देताना दिसली. ३७-२९ या गुणसंख्येवर हा सामना संपला असून तेलुगू टायटन्सने पहिल्याच सामन्यात त्यांची योग्यता सिद्ध केली आहे. यानंतरचा दुसरा सामना दिल्ली आणि मुंबई यांच्यात खेळवला जात आहे.