भावनेच्या भरात हेल्मेट फेकलं
सेमीफायनलपूर्वी संजू सॅमसन एका मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून आयसीसी त्याच्यावर कारवाई करू शकते. मॅच संपल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करताना संजूने भावनेच्या भरात आपलं हेल्मेट फेकलं होतं आणि दोन्ही हात आकाशाकडे उंचावून देवाचे आभार मानले होते. हे सेलिब्रेशन आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग मानलं जाऊ शकतं, ज्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
advertisement
लेव्हल 1 चा गुन्हा
आयसीसीच्या नियमांनुसार, क्रिकेटमधील साहित्याचा किंवा कपड्यांचा गैरवापर करणे हा गैरवर्तनाचा प्रकार मानला जातो, जो लेव्हल 1 चा गुन्हा ठरू शकतो. हेल्मेट हवेत फेकणं हे चुकीचं, निष्काळजीपणाचं किंवा धोकादायक वर्तन म्हणून मानलं जातं. जरी हे कृत्य आनंदाच्या भरात केलं असलं, तरी मॅच रेफरीच्या निर्णयावर संजूला शिक्षा होणार की नाही हे अवलंबून असेल, ज्यामुळे भारतीय गोटात चिंतेचं वातावरण आहे.
मॅच फीमधील 50 टक्क्यांपर्यंत कपात
दरम्यान, लेव्हल 1 च्या या गुन्ह्यासाठी आयसीसी मॅच रेफरी खेळाडूला अधिकृत ताकीद देऊ शकतो किंवा त्याच्या मॅच फीमधील 50 टक्क्यांपर्यंत कपात केली जाऊ शकते. याशिवाय संजूच्या खात्यात 1 किंवा 2 डिमेरिट पॉईंट्स देखील जोडले जाऊ शकतात. 5 मार्चच्या मोठ्या लढतीपूर्वी अशा प्रकारची कारवाई झाल्यास त्याचा परिणाम टीम इंडियावर होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
