इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार श्रेयस अय्यरने बीसीसीआयला सविस्तर मेल केला आहे, ज्यात त्याने काही काळासाठी आपल्याला रेड-बॉल क्रिकेटमधून ब्रेक हवा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. श्रेयस अय्यरला मागच्या काही काळापासून पाठदुखीचा त्रास आहे, या दुखापतीतून पूर्णपणे बरं होण्यासाठी त्याने रेड-बॉल क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे. याबद्दलची माहिती अय्यरने निवड समिती आणि बीसीसीआयला दिली आहे.
advertisement
पाठीच्या दुखापतीमुळे आपण पाच दिवसांच्या क्रिकेटचा भार सहन करू शकत नाही. आपण रणजी ट्रॉफीचा यंदाचा मोसम खेळलो, कारण 4 दिवसांच्या सामन्यांच्या मध्ये आपण ब्रेक घेत होतो, पण टेस्ट क्रिकेट आणि इंडिया-ए कडून खेळताना असं करता येणार नाही. शरीर टेस्ट क्रिकेटसाठी तयार होत नाही, तोपर्यंत आपण यापासून लांब राहणार आहोत, असं श्रेयस अय्यर या मेलमध्ये म्हणाला आहे.
श्रेयस अय्यरने अचानक सोडली इंडिया ए
श्रेयस अय्यरला अलीकडेच ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सीरिजसाठी इंडिया ए चा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. या सीरिजमध्ये दोन अनधिकृत टेस्ट मॅच खेळवल्या जाणार होत्या, पण पहिल्या टेस्टमध्ये अय्यर स्वस्तात आऊट झाला. यानंतर दुसरी टेस्ट सुरू व्हायच्या एक दिवस आधी अय्यरने माघार घेतली. अय्यरने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, पण आता याचं खरं कारण समोर आलं आहे.
श्रेयस अय्यर टीम इंडियाकडून 14 टेस्ट खेळला आहे, ज्यात त्याने 37 च्या सरासरीने 811 रन केल्या. श्रेयस अय्यरने शेवटची टेस्ट 2024 साली इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात खेळली. त्या सीरिजमध्येही पाठदुखीमुळे श्रेयस अय्यरला मध्येच माघार घ्यावी लागली होती. यानंतर श्रेयस अय्यरला रणजी ट्रॉफीमध्येही खेळता आलं नाही, त्यामुळे मोठा वाद झाला. श्रेयस अय्यरला बीसीसीआयने केंद्रीय करारातूनही वगळले होते. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही अय्यरचं पुनरागमन होईल, असं वाटत होतं, पण पाठीच्या दुखापतीने पुन्हा एकदा त्याला दगा दिला आहे.