अवघ्या 27 व्या वर्षी भीषण अपघात
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अक्षु फर्नांडो यांचे निधन झालं असून तो 2010 च्या अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा महत्त्वाचा हिस्सा होता. कोलंबो येथे रेल्वे रूळ ओलांडत असताना झालेल्या एका दुर्दैवी ट्रेन अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर तो कित्येक वर्षे कोमात होता आणि लाइफ सपोर्टवर आपली जगण्याची लढाई लढत होता. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याच्यासोबत हा भीषण अपघात घडला होता.
advertisement
अक्षु फर्नांडो कोण होता?
अक्षु हा उजव्या हाताचा फलंदाज होता आणि विशेष म्हणजे या अपघाताच्या काही दिवस आधीच त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. 9 वर्षांच्या डोमेस्टिक करियरमध्ये त्याने कोल्ट्स, पानाडुरा आणि चिलाव स्पोर्ट्स क्लब अशा विविध नामांकित क्लब्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या नावावर वरिष्ठ स्तरावर 7 अर्धशतकांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय कॉमेंटेटर रोशन अभयसिंघे यांनी अक्षुला श्रद्धांजली वाहताना एक "नेकदिल आणि हसरा तरुण" अशा शब्दांत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
गुणवान खेळाडू गमावला
दरम्यान, आकड्यांचा विचार केला तर अक्षुने 39 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 1067 रन्स केले होते. तसेच 20 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 298 रन्स बनवले होते. त्याच्या जाण्याने श्रीलंका क्रिकेटने एक गुणवान खेळाडू गमावला, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
