चार क्रिकेटर्स निलंबित
निलंबित करण्यात आलेल्या या खेळाडूंनी वेगवेगळ्या स्तरांवर राज्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि आता त्यांच्याविरोधात राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. असम क्रिकेट संघ (Assam Cricket Association - ACA) ने अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी या चार क्रिकेटर्सना निलंबित केले आहे. या खेळाडूंवर असमच्या काही खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि भडकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, जे सैयद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये सहभागी झाले होते. हे चारही खेळाडू रियान पराग याचे टीममेट्स आहेत.
advertisement
फौजदारी कारवाई सुरू
एसीएचे सचिव सनातन दास यांनी सांगितले की, आरोप समोर आल्यानंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक आणि सुरक्षा युनिटने (ACSU) चौकशी केली. एसीएने देखील फौजदारी कारवाई सुरू केली आहे. प्रथम दृष्ट्या यांच्या गंभीर गैरवर्तनात सामील होण्याचे संकेत मिळतात, ज्यामुळे खेळाच्या अखंडतेला धक्का पोहोचतो.
चौकशीचा अंतिम निकाल लागेपर्यंत...
सनातन दास यांनी पुढं स्पष्ट केलंय की, परिस्थिती आणखी बिघडू नये, यासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीचा अंतिम निकाल लागेपर्यंत किंवा असोसिएशनने पुढील कोणताही निर्णय घेईपर्यंत निलंबन कायम राहील. असमचे सैयद मुश्ताक लीग मॅचेस 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान लखनऊ येथे आयोजित करण्यात आले होते, पण संघ सध्या सुरू असलेल्या सुपर लीग फेरीत प्रवेश करू शकला नाही.
मॅचमध्ये भाग घेण्यास मनाई
दरम्यान, निलंबन कालावधीत, या खेळाडूंना एसीए, तिच्या जिल्हा युनिट्स किंवा संबंधित क्लब्सद्वारे आयोजित कोणत्याही राज्य-स्तरीय टूर्नामेंट किंवा मॅचमध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, मॅच रेफरी, कोच, अम्पायर इत्यादी म्हणून कोणत्याही क्रिकेट संबंधित ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेणं देखील प्रतिबंधित आहे.
