बैठकीमध्ये 14 मतं बांगलादेशच्या विरोधात पडल्यामुळे आता त्यांना भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आयसीसीने बांगलादेशला पुढच्या 24 तासांमध्ये निर्णय घ्या, असा थेट इशारा दिला आहे. आयसीसीच्या या अल्टिमेटममुळे आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पुन्हा एकदा त्यांच्या सरकारकडे जावं लागणार आहे. बांगलादेश सरकारने परवानगी दिली नाही, तर स्कॉटलंडला ग्रुप सी मध्ये बांगलादेशची जागा दिली जाईल. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशला पाठिंबा दिला असला तरी पीसीबीने आयसीसीसोबतचे कोणतेही संबंध तोडलेले नाहीत. शेवटच्या क्षणी आयसीसी ठिकाण बदलण्याची कोणतीही शक्यता नव्हती.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयर्लंडसोबत आपला ग्रुप बदलण्यात यावा, अशी मागणीही केली होती. कारण आयर्लंड त्यांचे सगळे सामने श्रीलंकेमध्ये खेळणार आहे. पण क्रिकेट आयर्लंडने आमच्या वेळापत्रकामध्ये कोणताच बदल होणार नाही, हे आयसीसीने स्पष्ट केल्याचं त्यादिवशीच सांगितलं. आयसीसीच्या आजच्या बैठकीत पुन्हा हाच मुद्दा मांडण्यात आला.
बांगलादेशची टीम 7, 9 आणि 14 फेब्रुवारीला कोलकाता येथे वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंडविरुद्ध ग्रुप स्टेजमधील 3 सामने खेळणार आहे, तर 17 फेब्रुवारीला त्यांचा सामना वानखेडे स्टेडियमवर नेपाळविरुद्ध होणार आहे.
बैठकीनंतर आयसीसीचं निवेदन
क्रिकेट बोर्डांच्या बैठकीनंतर आयसीसीने एक निवेदन जारी करून त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. स्वतंत्र सुरक्षा मुल्यांकन केल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू, मीडिया प्रतिनिधी, अधिकारी आणि चाहत्यांना कोणताही धोका नसल्याचं दिसून आलं आहे, असं आयसीसीने त्यांच्या निवेदनामध्ये म्हटलं आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमधून केकेआरचा बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला बाहेर केलं गेलं. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळायला नकार दिला आहे.
