आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा विजय झाला तर लागोपाठ 2 टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरेल. तसंच एकूण 3 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रमही भारतीय टीमच्या नावावर होईल, आतापर्यंत कोणत्याच टीमला 3 वर्ल्ड कप जिंकता आलेले नाहीत. दुसरीकडे न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप फायनलआधी टीम इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला होता, पण यंदा टीम इंडिया कोणतीही कसर ठेवू इच्छित नाही.
advertisement
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार फायनल मॅचआधी टीम इंडियाने हॉटेल आणि ड्रेसिंग रूममध्ये बदल केले आहेत. नकारात्मक इतिहास तोडण्यासाठी टीम इंडियाने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 2023 वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया जिथे थांबली होती, तिथे आता खेळाडू थांबणार नाहीत. तसंच नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या होम ड्रेसिंग रूमऐवजी भारतीय टीम व्हिजिटिंग टीमच्या ड्रेसिंग रूमचा वापर करण्याची शक्यता आहे.
अहमदाबादमध्ये याआधी टीम आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये राहायची. 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलला देखील टीम याच हॉटेलमध्ये थांबली होती. याआधी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमी फायनलच्या आधी प्रॅक्टिससाठीही टीम इंडिया उशिरा आली होती. चंद्र ग्रहण असल्यामुळे भारतीय टीमने सरावाला उशिरा सुरूवात केल्याचं बोललं गेलं होतं.
टीम इंडियाचं अहमदाबादमधलं रेकॉर्ड
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने आतापर्यंत 10 टी-20 मॅच खेळल्या आहेत, यातल्या 7 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला तर 3 मॅच त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने 2 मॅच अहमदाबादमध्ये खेळल्या, यातल्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 17 रननी विजय झाला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला 76 रननी पराभवाचा धक्का बसला. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा हा एकमेव पराभव होता.
