अभिनेता व निर्माते विद्यान माने यांनी दावा केला आहे की, पलाश मुच्छल जेव्हा एका दुसऱ्या महिलेसोबत बिछान्यावर रंगेहात पकडला गेला, तेव्हा ते स्वतः तिथे उपस्थित होते. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत 34 वर्षीय माने यांनी सांगितले की, 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या लग्न समारंभादरम्यान मी तिथेच होतो. पलाश दुसऱ्या महिलेसोबत बिछान्यावर रंगेहात सापडला. तो क्षण अत्यंत भयानक होता. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला चांगलीच मारहाण केली. संपूर्ण कुटुंबच चोर आहे. मला वाटलं होतं की तो लग्न करून सांगलीत स्थायिक होईल, पण हे सगळं माझ्यासाठी पूर्णपणे उलट ठरलं.
advertisement
40 लाखांच्या फसवणुकीचा आरोप
विद्यान माने यांनी पलाश मुच्छलवर आर्थिक फसवणुकीचेही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की ते स्मृती मंधानाचे बालपणीचे मित्र आहेत आणि पलाशची ओळख त्यांना मंधाना कुटुंबाच्या माध्यमातून झाली होती. माने यांच्या म्हणण्यानुसार, पलाश मुच्छलने एका अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपटात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली त्यांची 40 लाख रुपयांहून अधिक रक्कम फसवणूक करून घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी महाराष्ट्रातील सांगली येथे पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
पलाशच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया
या संदर्भात विद्यान माने यांनी केलेल्या आरोपावर पलाश मुच्छलच्या कुटुंबियांशी 'न्यूज 18 मराठी'ने संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
पलाशची इन्स्टाग्राम स्टोरी
दरम्यान या आरोपांवर पलाश मुच्छलने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली भूमिका मांडली आहे. त्याने लिहिले की, सांगलीच्या विद्यान माने यांनी सोशल मीडियावर माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. हे आरोप माझी प्रतिमा खराब करण्याच्या दुर्भावनापूर्ण हेतूने केले गेले आहेत. हे प्रकरण दुर्लक्षित केले जाणार नाही. माझे वकील श्रेयांश मिथारे या विषयावर योग्य तो कायदेशीर प्रतिसाद देतील.
काय झालं होतं तेव्हा
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होता. मात्र लग्नाच्या आधी दोन्ही कुटुंबांनी स्मृतींच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचे कारण देत विवाह पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर लवकरच सोशल मीडियावर पलाशच्या कथित बेवफाईचे किस्से व्हायरल होऊ लागले. काही काळानंतर स्मृती मंधानाने स्वतः सार्वजनिकरित्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले, मात्र यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.
विद्यान माने यांनी पुढे सांगितले की, गेल्या महिन्यात मी पलाशची आई अमिता मुच्छल यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी मला सांगितले की चित्रपट रिलीजसाठीचा बजेट आता 1.5 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यांनी मला आणखी 10 लाख रुपये गुंतवण्यास सांगितले, अन्यथा माझे आधीचे पैसेही परत मिळणार नाहीत, अशी धमकी दिली. मला ब्लॅकमेल करण्यात आले आणि चित्रपटातून काढून टाकण्याची धमकीही देण्यात आली. त्यामुळेच मला पोलिसांत तक्रार करावी लागली.”
माने यांनी असेही म्हटले की, लग्न रद्द झाल्यानंतर पलाशच्या कुटुंबीयांनी मला सर्वत्र ब्लॉक केले. मला नंतर कळले की या चित्रपटातील इतर कलाकारांनाही त्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकांकडून निर्मात्यांची फसवणूक होत असल्याच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या, पण हे प्रकरण तर सरळसरळ चोरीचे आहे. माझ्याकडे चॅट्स, फोन कॉल्ससह सर्व पुरावे सुरक्षित आहेत आणि ते मी पोलिस तसेच माध्यमांसमोर सादर करण्यास तयार आहे.
