क्रिकेटमध्ये जर्सी नंबर हा केवळ आकडा नसतो. तो खेळाडूची ओळख, आवड, कधी कधी भावनिक नातं दर्शवतो. मात्र 69 हा असा नंबर आहे, ज्याने खेळापेक्षा जास्त वाद, अस्वस्थता आणि सामाजिक अर्थ निर्माण केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने या नंबरवर कधीही अधिकृत बंदी घातलेली नाही. तरीही काही देशांमध्ये हा नंबर घालण्यास मनाई आहे. मग नेमकं अडचण काय?
advertisement
ICC च्या नियमांत 69 पूर्णपणे वैध
क्रिकेटमध्ये खेळाडू साधारणपणे 1 ते 99 यांपैकी कोणताही जर्सी नंबर निवडू शकतो, तो नंबर आधीपासून संघातील दुसऱ्या सक्रिय खेळाडूकडे नसला तर. तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर 69 हा नंबर पूर्णपणे कायदेशीर आहे. ICC च्या नियमपुस्तिकेत या नंबरवर बंदी असल्याचा कुठेही उल्लेख नाही.
मात्र वादाचा मूळ मुद्दा हा कायदेशीर नसून सांस्कृतिक आहे. 69 या आकड्याला असलेले दुहेरी आणि लैंगिक संदर्भ अनेक देशांमध्ये अनुचित मानले जातात. याच कारणामुळे काही राष्ट्रीय क्रिकेट बोर्ड हा नंबर आपल्या संघात वापरण्याची परवानगी देत नाहीत.
न्यूझीलंडमध्ये 69 वर थेट बंदी
भारत दौऱ्यावर आलेलं न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (NZC) हे त्या मोजक्या बोर्डांपैकी एक आहे, ज्यांनी जर्सी नंबर 69 वर स्पष्ट बंदी घातली आहे. याचं सर्वात गाजलेलं उदाहरण म्हणजे वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन.
फर्ग्युसन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये 69 नंबरची जर्सी घालत होता. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून पदार्पण करताच, बोर्डाने त्यांना हा नंबर बदलण्यास सांगितलं. NZC ने अधिकृतपणे स्पष्ट केलं की 1 ते 99 मधील फक्त 69 हा एकमेव नंबर आहे, जो त्याच्या लैंगिक अर्थांमुळे प्रतिबंधित आहे.
न्यूझीलंड व्यतिरिक्त कोणत्याही क्रिकेट बोर्डाने जाहीरपणे 69 नंबरवर अधिकृत बंदी असल्याचं सांगितलेलं नाही. मात्र इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्येही हा नंबर खेळाडूंच्या जर्सीवर क्वचितच दिसतो. अनेक खेळाडू वाद टाळण्यासाठी स्वतःहूनच हा नंबर निवडत नाहीत, असं मानलं जातं.
भारतात 69 नंबरबाबत वेगळी भूमिका
भारतात मात्र जर्सी नंबर 69 बाबत कोणतीही अधिकृत बंदी किंवा मोठा वाद नाही. खूप वर्षांपूर्वी एका चाहत्याने भारतीय संघाची जर्सी घालून त्यावर 69 नंबर लिहून मैदानात हजेरी लावली होती. तेव्हाच अनेक भारतीय चाहत्यांना या नंबरची पहिल्यांदा चर्चा कळली.
खेळाडूंच्या बाबतीत बोलायचं झालं, तर करुण नायर यांनी भारतीय क्रिकेटमध्ये 69 नंबरची जर्सी वापरलेली आहे. भारतीय क्रिकेट संस्कृतीत जर्सी नंबर हा प्रामुख्याने वैयक्तिक आवड आणि उपलब्धतेशी जोडलेला मानला जातो, त्याच्या कथित सामाजिक अर्थांशी नाही.
क्रिकेटमध्ये जर्सी नंबर 69 वर कोणतीही आंतरराष्ट्रीय बंदी नाही. मात्र सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक संवेदनशीलतेमुळे काही देशांमध्ये हा नंबर आजही अस्वस्थता निर्माण करतो. जर्सी नंबर हा खेळाडूची ओळख असतो, पण कधी कधी तीच ओळख वादाचं कारणही ठरते आणि 69 हा त्याचाच एक अनोखा नमुना आहे.
