पुढील वन-डे वर्ल्ड कप 2027मध्ये दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये खेळवला जाणार आहे. हे तिन्ही देश क्रिकेटच्या कुंभमेळ्याचं सामूहिक यजमानपद भूषवणार आहेत. 2027 पर्यंत सध्याच्या टीम इंडियामधील सात खेळाडूंचं वय चाळीशीच्या आसपास असेल. पण, जर त्यांनी आपला फिटनेस मेंटेन केला तर ते पुढील वर्ल्ड कपही खेळू शकतात. कारण, सचिन तेंडुलकर वयाच्या चाळीशीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला तर माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसुद्धा वयाच्या 38व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळला. धोनी तर आयपीएलमध्ये अजूनही खेळत आहे. 2023मध्ये वयाच्या 42व्या वर्षी त्याने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज या आयपीएल टीमला विजेतेपद मिळवून दिलं आहे.
advertisement
टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. पुढील वन-डे वर्ल्ड कपपर्यंत तो 39 वर्षांचा होईल. विराटचा फिटनेस बघता तो 2027चा क्रिकेट वर्ल्ड कप सहज खेळेल, असा क्रिकेट तज्ज्ञांचा आणि चाहत्यांचा अंदाज आहे. टीम इंडियाचा सध्याचा वन-डे कॅप्टन रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि बॅट्समन सूर्यकुमार यादव सध्या 33 वर्षांचे आहेत. ऑलराउंडर रवींद्र जडेजाचं वय 34 वर्षे आहे तर केएल राहुल 31 वर्षांचा आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप टीममध्ये 24 वर्षांचा शुभमन गिल हा सर्वात तरुण खेळाडू होता तर, 37 वर्षांचा आर. अश्विन हा टीममधील सर्वांत जास्त वयाचा खेळाडू होता. त्यामुळे वयाची तिशी ओलांडलेले सर्व खेळाडू पुढील वर्ल्ड कप खेळतील की नाही, हे सर्वस्वी त्यांच्या फिटनेस आणि फॉर्मवर अवलंबून असेल.