मिळालेल्या माहितीनुसार, स्टारशिप पृथ्वीच्या कक्षेत 1,50,000 किलो वजनाचे पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. याशिवाय ते मून मिशन, अर्थ टू अर्थ ट्रान्सपोर्टेशन आणि इंटरप्लॅनेटरी ट्रान्सपोर्टेशन करण्यासदेखील सक्षम आहे. स्टारशिपची उंची 164 फूट आणि व्यास 9 मीटर आहे. त्याची पेलोड क्षमता 100 ते 150 टन इतकी असून, त्यात सहा इंजिन्स बसवण्यात आली आहेत. यापैकी तीन रॅप्टर आणि तीन रॅप्टर व्हॅक्यूम इंजिन आहेत.
advertisement
याचे बूस्टर पूर्णपणे रीयुझेबल आहेत. हे रॉकेट प्रक्षेपणानंतर काही वेळातच पृथ्वीच्या वातावरणात परत येऊ शकतं आणि या प्रक्षेपणाच्या ठिकाणी बांधलेल्या टॉवरमध्ये ते पकडलं जाऊ शकतं. स्टारशिप हा एलॉन मस्क आणि स्पेसएक्सचा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. नासाच्या आर्टेमिस प्रोग्रॅमध्ये स्टारशिप एअरक्राफ्टचा वापर होणार आहे. या मोहिमेतून मानवाला पुन्हा एकदा चंद्रावर पाठवलं जाणार आहे. एलॉन मस्क हे यान मंगळावरदेखील पाठवण्याचा विचार करत आहेत.
स्टारशिपची पाचवी चाचणी यशस्वी
13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी टेक्सासमधल्या बोका चिका इथून स्टारशिप रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. उड्डाणानंतर काही मिनिटांत रॉकेटचे सुपर हेवी बूस्टर अंतराळयानापासून वेगळे झाले. यानाने हिंदी महासागरात नियंत्रित लँडिंग केलं. रॉकेटचे सुपर हेवी बूस्टर पृथ्वीपासून सुमारे 96 किलोमीटर दूर जाऊन पुन्हा लाँचपॅडवर परतले आणि टॉवरने त्याला व्यवस्थित पकडलं. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे एक तास पाच मिनिटांचा कालावधी लागला.
स्टारशिपची पहिली ऑर्बायटल चाचणी 20 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली होती. ती चाचणी अयशस्वी झाली होती. स्टारशिप सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच त्याचा हवेत स्फोट झाला होता. 18 नोव्हेंबर 2023 रोजी झालेली दुसरी चाचणीदेखील अयशस्वी ठरली होती. 14 मार्च 2024 झालेली तिसरी चाचणी अंशत: यशस्वी झाली होती.
या वर्षी 6 जून रोजी स्टारशिपची चौथी चाचणी घेतली गेली होती. स्टारशिपची ती चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली होती. टेक्सासमधल्या बोका चिका इथून ते लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचे बूस्टर मेक्सिकोच्या आखातात उतरवण्यात आले होते.