कधी कधी लोकांना सवय असते की इअरफोन खराब झाला किंवा हरवला तर ते एकाच कानात घालून इअरफोन वापरतात आणि गाणी ऐकतात. पण या सगळ्यात एक प्रश्न उभा रहातो की ही सवय नेहमीसाठी योग्य आहे का? असं एका कानाने ऐकल्याने कानाशी संबंधीत काही समस्या तर तयार होत नाही ना?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फक्त एका कानात सतत संगीत ऐकणं स्वतःमध्ये हानिकारक नाही, परंतु जर आवाजाची पातळी जास्त असेल आणि वेळ खूप लांब असेल तर त्या कानावर ताण येऊ शकतो. त्यामुळे त्या कानात आवाजाचा दाब वाढतो आणि दीर्घकाळात श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका निर्माण होतो. दुसऱ्या कानावर आवाज न आल्यामुळे मेंदूला समतोल ध्वनी संकेत मिळत नाहीत, त्यामुळे दिशाभान कमी होऊ शकतं. म्हणजेच, आवाज कुठून येतोय हे अचूक समजणं कठीण होतं.
advertisement
तसेच, एकाच कानाने सतत ऐकल्याने तो कान थकतो, ज्यामुळे कानात किरकिर, गूंज किंवा त्रास जाणवू शकतो. दीर्घकाळ असं केल्यास श्रवणशक्तीमध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असते.
ही समस्या टाळण्यासाठी काही सोप्या गोष्टींची काळजी घ्या.
आवाजाची पातळी मध्यम ठेवा, ती 60% पेक्षा जास्त ठेवू नका. जास्त वेळ म्यूजिक ऐकत असाल तर दोन्ही कानात इअरफोन वापरा. प्रत्येक तासाला किमान 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या.
शक्यतो नॉईज कॅन्सलेशन असलेले हेडफोन वापरा, ज्यामुळे जास्त आवाजाची गरज भासत नाही. लक्षात ठेवा, संगीत हा आनंद देणारा अनुभव आहे, पण कानांचं आरोग्य जपणं त्याहून महत्वाचं आहे. योग्य सवयी अंगीकारल्यास तुम्ही संगीताचाही आनंद घेऊ शकता आणि श्रवणशक्तीही सुरक्षित ठेवू शकता.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
