दुबई: लाल समुद्रातील समुद्राखालील केबल तुटल्यामुळे आशिया आणि मध्य पूर्वेतील इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. यात भारत, पाकिस्तान आणि यूएईचा समावेश आहे. असोसिएटेड प्रेस (एपी) वृत्तसंस्थेनुसार, या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
नेटब्लॉक्स (NetBlocks) या इंटरनेट सेवांवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने म्हटले आहे की- लाल समुद्रातील समुद्राखालील केबल्सच्या मालिकेत झालेल्या बिघाडामुळे अनेक देशांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी खराब झाली आहे. आणि त्यात भारत व पाकिस्तानचा विशेष उल्लेख केला आहे. त्यांनी सौदी अरेबियातील जेद्दाहजवळ असलेल्या 'SMW4' आणि 'IMEWE' या केबल प्रणालींमध्ये बिघाड झाल्याचे कारण दिले आहे.
मायक्रोसॉफ्टनेही त्यांच्या 'अझूर क्लाउड' सेवेमध्ये व्यत्यय आल्याचे मान्य केले आहे. त्यांनी युझर्सना मध्य पूर्वेतून जाणाऱ्या मार्गांवर लेटन्सी वाढल्याचा (गती मंदावल्याचा) इशारा दिला आहे. मायक्रोसॉफ्टच्या माहितीनुसार त्यांचे युझर्स विशेषतः ज्यांचा डेटा आशिया आणि युरोपमध्ये जातो त्यांना लेटन्सी वाढल्याचा अनुभव येऊ शकतो.
समुद्राखालील फायबर केबल्स दुरुस्त करायला वेळ लागतो. त्यामुळे आम्ही ग्राहकांवरील परिणाम कमी करण्यासाठी मार्ग सतत तपासत आणि ऑप्टिमाइज करत आहोत. आम्ही रोज अपडेट्स देत राहू किंवा परिस्थितीत बदल झाल्यास लवकरच कळवू, असे मायक्रोसॉफ्टने सांगितले. मात्र या मार्गातील बदलामुळे नेहमीपेक्षा जास्त लेटन्सी (गती कमी) होत आहे.
दरम्यान येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रातील या केबल्सला लक्ष्य केल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. हौती बंडखोर हे इस्त्रायलवर गाझा पट्टीतील हमाससोबतचे युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हौतींनी यापूर्वी अशा हल्ल्यांचा इन्कार केला आहे.
उपग्रहांशी जोडणी आणि जमिनीवरील केबल्सप्रमाणेच समुद्राखालील केबल्स इंटरनेटच्या मुख्य कनेक्टिव्हिटीपैकी एक आहे. सामान्यतः इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे Multiple access points असतात आणि एक Point अयशस्वी झाल्यास ते डेटा दुसऱ्या मार्गाने वळवतात. ज्यामुळे वापरकर्त्यांसाठी इंटरनेटची गती मंदावते.
हा व्यत्यय टाटा कम्युनिकेशन्सद्वारे व्यवस्थापित असलेल्या 'साउथ ईस्ट एशिया-मिडल ईस्ट-वेस्टर्न युरोप ४' (SMW4) आणि अल्काटेल-ल्यूसेंटच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमद्वारे चालवल्या जाणाऱ्या 'इंडिया-मिडल ईस्ट-वेस्टर्न युरोप' (IMEWE) या दोन केबल्समध्ये झालेल्या बिघाडाशी संबंधित आहे.
पाकिस्तानमधील दूरसंचार क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन्स कंपनी लिमिटेडने शनिवारी या केबल्स तुटल्याची माहिती दिली. सौदी अरेबियाने मात्र अद्याप या व्यत्ययावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
जहाजांच्या नांगरांमुळे समुद्राखालील केबल्स तुटण्याची शक्यता असते. पण त्यांना हल्ल्यातही लक्ष्य केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत दुरुस्तीसाठी आठवडे लागू शकतात. कारण दुरुस्ती करणाऱ्या जहाजाला आणि कर्मचाऱ्यांना तुटलेली केबल शोधून तिच्यावर काम करावे लागते.
हा प्रकार येमेनच्या हौती बंडखोरांनी इस्त्रायल-हमास युद्धामुळे इस्त्रायलला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेत घडला आहे. इस्त्रायलने याला हवाई हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यात बंडखोर चळवळीच्या प्रमुख नेत्यांना ठार मारण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाल समुद्र हा संघर्षबिंदू बनला आहे. एपीनुसार २०२३ च्या अखेरीपासून ते २०२४ पर्यंत हौती सैन्याने १०० हून अधिक जहाजांना लक्ष्य केले आहे. ज्यात चार जहाजे बुडाली आणि किमान आठ खलाशांचा मृत्यू झाला.