अपघाती मृत्यूवरून पालिकेची सारवासारव
ठाणे शहरातील बहुतांश अपघाती मृत्यू हे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नसून वाहनचालकांच्या बेदरकार आणि निष्काळजी वाहनचालनाामुळे होत असल्याचा महत्त्वाचा दावा ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयात केला आहे. खड्ड्यांमुळे ठाण्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या आरोपांवर न्यायालयाने स्वतःहून दखल घेत महापालिकेला स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार ठाणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या सूचनेनुसार विशेष समिती स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
महापालिकेने 13 जुलै 2025 रोजी झालेल्या एका अपघाताचा संदर्भ देत कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे नमूद केले आहे. संबंधित अपघात हा वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे तपासात समोर आल्याचा दावा पालिकेने केला आहे. या घटनेचा तपशील 18 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयात आधीच सादर करण्यात आल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.
दरम्यान 13 जुलै 2025 रोजी नागला बंदर परिसरात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका 21 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तसेच 21 ऑक्टोबर 2025 रोजी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार मनोज ठाकूर गंभीर जखमी झाले तर त्यांच्या मागे बसलेल्या स्वाती कदम यांचा मृत्यू झाला होता.
2019 मध्ये घोडबंदर मार्गावर झालेल्या काही अपघातांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचेही महापालिकेने न्यायालयाला कळवले आहे.
