ठाण्यात पाण्याचा मोठा फटका
पाणीपुरवठा विभागाने परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. मात्र संबंधित जलवाहिनी ही जुनी असून ती प्रिस्ट्रेस काँक्रीट तंत्रज्ञानाने बांधलेली असल्याने दुरुस्तीचे काम अधिक अवघड ठरत आहे. तांत्रिक अडचणींमुळे हे काम पूर्ण होण्यासाठी किमान चार दिवसांचा कालावधी लागू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
पाणी कपात किती दिवस राहणार?
या बिघाडामुळे ठाणे शहराकडे येणारा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात घटला असून त्यामुळे शहरात 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.15 डिसेंबर पर्यंत शहरातील विविध भागांमध्ये झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. या कालावधीत प्रत्येक विभागाला दिवसातून सुमारे 12 तास पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.
या व्यवस्थेमुळे नागरिकांना कमी प्रमाणात तसेच काही प्रमाणात अनियमित स्वरूपात पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच पाणी साठवून ठेवावे आणि अनावश्यक वापर टाळावा असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न सुरू असून नागरिकांनी या काळात महापालिकेला सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
