28 ऑगस्ट रोजी फाल्कन 9 रॉकेटचं लँडिंग अयशस्वी झालं होतं. रॉकेटच्या पहिल्या टप्प्यासाठी हे 23वं मिशन होतं आणि त्यात 21 स्टारलिंक सॅटेलाइट्सचं प्रक्षेपण होणार होतं. ते प्रक्षेपण अयशस्वी झाल्यानंतर स्पेसएक्सने पुन्हा प्रयत्न केला आणि दोन फाल्कन 9 रॉकेट्स यशस्वीरीत्या प्रक्षेपित केली. अमेरिकन उद्योगपती आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी या यशानंतर एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट करून टीमचं कौतुक केलं. "स्पेसएक्स टीमने उत्तम काम केलं आहे," अशी पोस्ट त्यांनी केली.
advertisement
फाल्कन 9 हे पुन्हा वापरता येण्याजोगं टू-स्टेज रॉकेट आहे. स्पेसएक्सने पृथ्वीच्या कक्षेत आणि त्यापलीकडे मानवाच्या आणि पेलोड्सच्या सुरक्षित वाहतुकीसाठी हे रॉकेट डिझाइन केलं आहे. फाल्कन 9 हे जगातलं पहिले ऑर्बिटल क्लास पुन्हा वापरता येण्याजोगं रॉकेट आहे. त्यामुळे अंतराळात जाण्याचा खर्च कमी होतो.
फाल्कन 9 च्या पहिल्या स्टेजमध्ये नऊ मर्लिन इंजिन आणि ॲल्युमिनियम-लिथियम मिश्रधातूच्या टाक्यांचा समावेश आहे. त्या लिक्विड ऑक्सिजन आणि रॉकेट-ग्रेड केरोसीन (RP-1) प्रोपेलंट असतात. हे रॉकेट समुद्रसपाटीवर 7,71,100 किलोग्रॅमपेक्षा जास्त थ्रस्ट तयार करतं.
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा) लवकरच स्पेसएक्सची मदत घेणार आहे. नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर काही महिन्यांपूर्वी 'नासा बोइंग स्टारलायनर' या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेले होते. यानातल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही अंतराळवीर तिथेच अडकले आहेत. त्यांना सुरक्षित परत आणण्याचं काम स्पेसएक्सच्या मदतीने केलं जाणार आहे. नासाने या दोघांनाही बोइंग स्टारलाइनरऐवजी स्पेसएक्सच्या 'क्रू ड्रॅगन' यानाने परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यम्स आणि विल्मोर स्पेसएक्सचा क्रू-9 मिशनसह पृथ्वीवर परत येतील.