पश्चिम आशियातील युद्धाने आता रौद्र रूप धारण केले असून, अमेरिकेने इराणच्या इस्फहान शहरावर सर्वात मोठा लष्करी हल्ला केला आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने इराणच्या एका मुख्य शस्त्रागार (Ammunition Depot) नष्ट करण्यासाठी २,००० पाउंड (सुमारे ९०७ किलो) वजनाचे महाभयंकर 'बंकर बस्टर' बॉम्ब डागले आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्फहान शहर हादरून गेले असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
बंकर भेदून शस्त्रागार उद्ध्वस्त
'वॉल स्ट्रीट जर्नल' आणि 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, अमेरिकेने इस्फहानमधील ज्या तळाला लक्ष्य केले, ते जमिनीच्या खाली खोलवर बांधलेले एक सुरक्षित शस्त्रागार होते. हे कंक्रीटचे मजबूत तळ फोडण्यासाठी अमेरिकेने विशेष 'पेनेट्रेटर म्युनिशन्स' म्हणजेच बंकर-बस्टर बॉम्बचा वापर केला. हे बॉम्ब जमिनीखालील अत्यंत सुरक्षित ठिकाणांनाही क्षणात उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवतात. या हल्ल्याचा मुख्य उद्देश इराणची लष्करी ताकद मुळापासून कमकुवत करणे हा होता.
ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडिओ
हल्ल्यानंतर काही वेळातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या आपल्या प्लॅटफॉर्मवर या स्फोटांचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात आकाशात झेपावणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत. या स्फोटांची तीव्रता इतकी भीषण होती की संपूर्ण परिसर आगीच्या ज्वाळांमुळे प्रकाशाने उजळून निघाला होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा इस्फहानला लक्ष्य केल्याने इराणच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागतिक तणावात भर:
या ताज्या हल्ल्यामुळे इराण-अमेरिका संघर्षात आता आगीत तेल ओतले गेले आहे. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये इराणचे मोठ्या प्रमाणावरील दारूगोळा आणि क्षेपणास्त्रांचा साठा नष्ट झाल्याचा अंदाज आहे. अद्याप जीवितहानीची अधिकृत आकडेवारी समोर आली नसली, तरी ट्रम्प यांनी स्वतः हा व्हिडिओ शेअर करणे ही इराणला दिलेली मोठी चेतावणी मानली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचा धोका टोकाला पोहोचला आहे.
